Breaking News

आदित्य बिर्ला सनलाइफचा आयपीओ आजपासून बाजारात किमान १४,२४० रु. गुंतवावे लागतील

मुबंई: प्रतिनिधी

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी आली आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसीचा आयपीओ आजपासून सुरू झाला आहे. गुंतवणूकदार १ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी बोली लावू शकतील. कंपनीने इश्यू प्राइस बँड ६९५-७१२ रुपये प्रति शेअर निश्चित केले आहे. आयपीओद्वारे २,७६८ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

हा आयपीओ ३.८८ कोटी इक्विटी शेअर्सचा असेल. यामध्ये आदित्य बिर्ला कॅपिटलकडून २८.५१ लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. तर सन लाईफ एएमसी ऑफर फॉर सेलद्वारे १.६ कोटी समभागांची विक्री करेल. यामध्ये १.९४ लाख इक्विटी शेअर्स आदित्य बिर्ला कॅपिटलच्या भागधारकांसाठी राखीव असतील.

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसीच्या सूचीबद्ध नसलेल्या समभागांचे जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) सतत घसरत आहे. कंपनीचा जीएमपी सध्या ५० रुपयांवर चालू आहे. यानुसार, त्याचे शेअर्स ७६२ (७१२+५०) रुपयांवर व्यवहार करत आहेत. आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसीचा जीएमपी २७ सप्टेंबरला ७० रुपये होता, जो आता ५० रुपयांवर आला आहे.

आयपीओमध्ये कंपनीने २० शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. अप्पर प्राइस बँडनुसार, किमान एक लॉटसाठी १४,२४० रुपये गुंतवावे लागतील. आयपीओचा ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

देशातील म्युच्युअल फंड उद्योगातील ही चौथी कंपनी असेल जी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. आतापर्यंत एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन म्युच्युअल फंड आणि यूटीआय म्युच्युअल फंड या सूचीबद्ध कंपन्या आहेत. याआधी प्रथम २०१७ मध्ये निप्पॉनची शेअर बाजारात नोंदणी झाली होती. त्यानंतर एचडीएफसीची नोंदणी झाली. निप्पॉन आणि एचडीएफसी शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे.

बिर्ला म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता २०१८ मध्ये १५,४९२ कोटी रुपये होती जी डिसेंबर २०२० मध्ये वाढून १९,५९५ कोटी रुपये झाली. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ३४८ कोटी रुपयांवरून ३६९ कोटी रुपये झाला आहे.

नोव्हेंबरमध्ये ३० कंपन्या आयपीओ आणण्याची शक्यता आहे. या आयपीओमध्ये बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान कंपन्यांनी प्रारंभिक शेअर विक्रीतून गेल्या १८ महिन्यात १५ हजार कोटी रुपये उभारले आहेत. तर फूड डिलिव्हरी करणार्‍या ‘झोमॅटो’ च्या कंपनीने आणलेला आयपीओ तब्बल ३८ पटचा भरणा झाल्याने तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. झोमॅटोनंतर अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे आयपीओसाठी प्रस्ताव सादर केले.

Check Also

इन्फोसिस एडीआर न्यूयॉर्क बाजारात ७ टक्क्याने घसरली १५.३० निचांकीस्तरावर

सूचीबद्ध IT फर्मने FY25 साठी १-३ टक्के महसूल वाढीचा अंदाज नि:शब्द स्थिर चलन (CC) जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *