Breaking News

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान आणि रॉकेटचे इंजिन बनविणारी सॅफ्रन ही कंपनीही नागपूरच्या मिहानमधून हैद्राबादला गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता एअर बस प्रकल्पा पाठोपाठ सॅफ्रनही गेल्याने आज सकाळपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली.

सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.

सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वातावरण अस्थिर केलं आहे. २०१४ नंतर महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का पडत आहे?, अशी विचारणा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केली. वेगळ्या विदर्भाच्या नावावर सत्तेत आलेले हे नेते, विदर्भावर आणि तरुणांवर अन्याय करत आहेत अशी टीकाही केली.

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, पाण्याची उपलब्धता आणि कुशल कामगार आहेत, तरीही प्रकल्प जाणं हा राजकीय करंटेपणा आहे. भाजपा सत्तेच्या हव्यासापोटी हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या या टीकेनंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, महाविकास आघाडी आणि घरात दाराला आतून कडी लावून बसलेले मुख्यमंत्री यांच्यामुळे हे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले. यांच्या कालखंडात केंद्र सरकारने हे प्रकल्प निर्माण केले होते. दोन्ही वेळी याआधीच्या राज्य सरकारने कोणतीही पावलं उचलली नाहीत. आता शिंदे-फडणवीस सरकारवर खापर फोडण्याचा निंदनीय प्रयत्न सुरु आहे, अशी टीका केली. तसेच महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तीन महिने कोणत्याही कंपनीला जमीन मिळत नाही. याचा अर्थ त्यांनी वर्षभरापूर्वी अर्ज केला असणार. एमआयडीसी किंवा मिहानमध्ये त्यांना जमीन मिळाली नसेल. या प्रकल्पांची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण मागील सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ठरावही संमत केला नाही, असा आरोप त्यांनी केला.

तर भाजपाच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, भाजपाला आरोप करण्यापलीकडे काही येत नाही. महाविकास आघाडीमुळे कोरोना आला आणि देशाची वाताहत झाली इतकंच म्हणणं आता बाकी आहे, असा टोला लगावत तपासे पुढे म्हणाले, २०२० पासून तुम्ही सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेतली आहे. जे काही होईल त्याला महाविकास आघाडी, उध्दव ठाकरे, शरद पवार जबाबदार आहेत असा एकमेव फालतू आरोप करण्यापलीकडे भाजपाला काही येत नाही. महाराष्ट्राची वाताहत होण्यासाठी, बदनाम करण्यासाठी एकमेव भाजपा जबाबदार आहे.

Check Also

EPFO आता वैद्यकीय खर्चासाठी १ लाख रूपये देणार या नियमात केला बदल

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने अलीकडेच परिच्छेद 68J अंतर्गत ऑटो क्लेम सेटलमेंट्सची विद्यमान पात्रता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *