Breaking News

RBI ने महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर घातले निर्बंध ग्राहकांना १० हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

मराठी ई-बातम्या टीम
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील अहमदगर येथे असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंध लादले आहेत. यानंतर बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या स्वतःच्या खात्यातून १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. आरबीआयच्या या कारवाईमुळे बँकेच्या खातेदारांनापुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
६ महिन्यांसाठी निर्बंध
बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध ६ डिसेंबर २०२१ रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि त्यांचे पुनरावलोकन केले जाईल. आरबीआयने म्हटले की, बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देणार नाही किंवा कोणतीही आगाऊ रक्कम देणार नाही. याशिवाय ते कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. बँकेला कोणतीही गुंतवणूक करणे, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करणे देखील प्रतिबंधित केले जाईल.
आदेशाची प्रत बँकेच्या आवारात
भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा आदेश सोमवारी संध्याकाळी मिळाला आहे. त्यानुसार कलम ३५ ए आणि कलम ५६ नुसार आजपासून पुढील सहा महिन्यांसाठी बँकेवर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून १०,००० रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. या नियमामुळे सामान्य खातेदार, व्यापारी, ज्यांची बचत तसंच व्यावसायिक खाती या बँकेत आहेत त्यांची तसेच ठेवीदारांचीही मोठी अडचण होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, जुन्या कर्जाचे नुतनीकरण, अॅडव्हान्स मंजूर करणे, कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे, ठेवी मोडणे, मालमत्ता हस्तांतरण अशा व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले आहे की या निर्बंधांना बँकिंग परवाने रद्द करणे असे समजू नये.
गेल्याच आठवड्यात बँकेची निवडणूक झाली. प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपवून दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने पुन्हा सत्ता मिळविली. त्यातच आता नव्याने आलेल्या संचालक मंडळाला या आव्हानांशी सामना करावा लागणार आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्हे आणि गुजरातमध्येही या बँकेच्या शाखा आहेत.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *