Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, उद्योगांना एक खिडकी योजनेतून परवानग्या महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण

सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे  जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित परिषदेस उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले.

या परिषदेत सर्व उपस्थितांनी महाराष्ट्राच्या वेगवान विकासाबाबत चर्चा केली. राज्यात होणाऱ्या नवीन पायाभूत सुविधांमुळे उद्योगस्नेही वातावरण वृद्धिंगत होईल, अशी प्रतिक्रिया सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली असून ‘वॉर रुम’द्वारे गुंतवणुकीसंदर्भात करण्यात येणाऱ्या सुयोग्य नियोजनाबद्दल आणि गतिमानतेबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र बदलेल, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिषदेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. मुंबईचा झपाट्याने विकास होत असून आता तिसरी मुंबई निर्माण होत आहे. या तिसऱ्या मुंबईत दळणवळणाच्या पर्यायी सोयी पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच कोस्टल रोड एकमेकांशी संलग्न केले जातील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून उद्योगांना जलद आणि विनासायास परवानग्या दिल्या जातील. त्याचबरोबरच दळणवळण, ऊर्जा, फळ आणि फळ प्रक्रिया उद्योग, कृषी आदी क्षेत्रात नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवीन उद्योगांना वीज सवलत देण्यात येत आहे. फक्त नवीन उद्योगांनाच वीज सवलत मिळावी, यासाठी उद्योगासाठी नवीन ऊर्जा धोरण आणले जाईल. ऊर्जा क्षेत्रात अधिक दमदार कामगिरी व्हावी, यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात नवनवीन उद्योग यावेत यासाठी उद्योग क्षेत्रांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, सेमीकंडक्टर या उद्योगात गुंतवणूक करून उद्योगांना सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. गृहकर्जाच्या व्याजाचा दर कमी करण्यावर भर दिला जाईल. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्व क्षेत्र खुली केले जातील.

यावेळी पीडब्ल्यूसीचे जागतिक अध्यक्ष बॉब मॉरित्झ, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, मैत्रीचे उपाध्यक्ष अजय आशर, पीडब्ल्यूसीचे भारतीय अध्यक्ष संजीव क्रिष्णन, हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, मुख्य कार्यकारी अधिकरी अरूंधती भट्टाचार्य, हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, एनटीटीचे अध्यक्ष शरद संघवी, वॉरबर्ग पीनकसचे व्यवस्थापकीय संचालक विशाल महादेविया, वाडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया, जेएम फायनॅन्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कंपानी आदी उपस्थित होते.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *