नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायुवरील करात थेट १०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी करत आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात ६ रूपयांची घट आली आहे. तर घरगुती पाईप गॅसच्या दरात ३.५० पैशांनी स्वस्त झाला आहे.
राज्य भरातही सीएजी वरील वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे राज्यातही सीएनजीच्या गॅसच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्या शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचविला जातो त्या गॅसच्या दरातही चांगलीच घट आल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या गॅसच्या किंमतीवर १३.५० टक्के इतका कर आकारण्यात येत होता. मात्र आजपासून या करात १०.५० इतकी कपात करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.
