मुंबई: प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मागे कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले व आता आता कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले, त्यामुळे या सर्व प्रकरणात ठाकरे सरकार कडून ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरिता बोलावलेल्या बैठकीनंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या अहवालातील शिफारसी माध्यमांसमोर जाहीर केल्या, यात घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या शिफारसीचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली असून, कुलगुरूंना देण्यात आलेय पत्रांमध्ये सुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाल्याने, त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पुर्ता बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू असून या संदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपाल यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावरच परीक्षा पार पाडाव्या अशी मागणी सुद्धा राज्यपाल यांच्याकडे केल्याचे ते शेवटी म्हणाले.
