Breaking News

अखेर विक्रम गोखले यांची रूपेरी पडदा आणि रंगमंचावरून एक्झिट

आपल्या अतुलनीय अभिनय आणि धीरगंभीर व भारदस्त आवाजाच्या जोरावर रंगमंच, दूरचित्रवाणी ते रूपेरी पडदा गाजविणारे तसेच कधी कधी आपल्या वक्तव्यामुळे खळबळ उडवून देणारे ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी आज जगाच्या रंगमंचावरून आणि रूपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तसेच त्यांच्यावर प्रदीर्घ आजारावर उपचार सुरु होते. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमांतून गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे २०१६ मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता. नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य गोखले सध्या करीत होते.

अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला. क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते.

विक्रम गोखले यांची नाटके आणि मराठी चित्रपट:- एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी, मॅरेथॉन जिंदगी, आघात, आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, नटसम्राट, भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वऱ्हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके, सिद्धांत, मुक्ता, वजीर

हिंदी चित्रपट:- अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, कैद में है बुलबुल, क्रोध, खुदा गवाह, घर आया मेरा परदेसी, चँपियन, जख़मों का हिसाब, जज़बात, जय बाबा अमरनाथ, तडीपार, तुम बिन, थोडासा रूमानी हो जाय, धरम संकट, परवाना, प्रेमबंधन, फलक द स्काय, बदमाश, बलवान, यही है जिंदगी, याद रखेगी दुनिया, लाईफ पार्टनर, लाड़ला, श्याम घनश्याम, सती नाग कन्या, सलीम लंगडे पे मत रो, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम, हसते हसते, हे राम.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *