Breaking News

हिंदी संगीतातील डिस्को किंग आणि गोल्डमॅन बप्पी लाहिरी यांचे निधन वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

हिंदी चित्रपट संगीतात डिस्को पध्दतीच्या पाश्चात्य संगीताचा वापर करणारे डिस्को किंग म्हणून ओळखले जाणारे संगीतकार- गायक आणि अंगावर सोने परिधान करण्याच्या सवयीमुळे गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हिंदी चित्रपट आणि संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले राहीली आहे. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बप्पी लाहिरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी १४ फेब्रुवारी घरी सोडण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बप्पी लहरी यांना प्रकृतीविषयक अनेक त्रास सुरू होते. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्रास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.

दरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये कोरोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले होते.

बप्पीदांचा अल्प परिचय

बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली.

परंतु त्यांची खरी लोकप्रियता आणि त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले ते अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या डान्स डान्स, डिस्को डान्सर या चित्रपटांच्या संगीतामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा डिस्को संगीताचा वापर त्यांनीच सुरु केला म्हंटल्यास वावगे ठरू नये. मिथुन चक्रवर्ती यांना खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून देण्यात बप्पीदांच्या संगीताचा मोठा वाटा होता. काही वर्षापूर्वी आलेल्या अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता नासीरूद्दीन शाह यांच्या डर्टी चित्रपटालाही त्यांनी संगीत तर दिलेच तसेच त्यातील उलाला गाणेही गायले. त्यांचे हे गाणे सुपर-डुपर हिट ठरले.

त्यांना संगीताबरोबरच सोन्याच्या दागिन्यांचा शौक होता. त्यामुळे ते कायम सोन्याचे दागिने घातलेल्या असायचे. त्यांच्या अंगावरील सोने संगीताबरोबरच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनलेली होती.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संरक्षण मंत्री, सुप्रिया सुळे, संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमान आदींसह अनेकांनी त्यांना ट्विट करत आंदरांजली वाहीली.

Check Also

परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने लिहिली खास पोस्ट राघव चड्डा याची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट

अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला जन्मदिवस आपला पती रागाव चड्डा याच्या सोबत साजरा करत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *