Breaking News

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील “देव”ने घेतली पडद्यावरून एक्झीट ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देव म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचा दोनच दिवसांपूर्वी ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील देवाने पडद्यावरून एक्झीट घेतली असे दु:खद भावना चित्रपट रसिकांबरोबर कलांवतांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा देव, मुलगा अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनव देव राहिले आहेत.

रमेश देव यांनी सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य परिषद संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते. त्यांची सरस्वती चंद्र चित्रपटातील नूतन यांच्या पतीची केलेली खलनायक व्यक्तीरेखा आणि स्व.राजेश खन्ना अभिनित आणि हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली होती. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास २८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यातील अनेक चित्रपटात खऱ्या आयुष्यातील रमेश देव आणि सीमा देव यांनी चित्रपटात पती-पत्नी म्हणून काम केले.

अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटसृष्टीमध्ये असे काही अभिनेते  असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असंत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक होते. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. ३० जानेवारील १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचे १९६२ मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ अर्थात सीमा देव  यांच्यासोबत लग्न झाले.

या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे ५९ वर्षे पूर्ण करणार होते. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देव यांची पत्नी सीमा देव यादेखील अल्झायमर या आजारानं त्रस्त असल्याची माहिती रमेश आणि सीमा देव यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आपण प्रार्थना करावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *