काश्मीरच्या संतूर या लोकवाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि आपल्या हळूवार संतूर वादनाने संतूरच्या स्वराची मोहिनी घालणाऱे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संतूरचा एक स्वर कमी झाल्याची भावना संगीतप्रेमीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
प.शिवकुमार शर्मा यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.
भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान त्यांनी मिळवून दिले. शर्मा यांच्या संतूर वादनाच्या कार्यक्रमासाठी देश आणि विदेशात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्याचबरोबर त्यांनी उस्ताद झाकिर हुसैन, कथ्थक लीजंड पंडित बिरजू महाराज यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी केलेले कार्यक्रम संस्मरणीय असे ठरले.
त्याचबरोबर यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटासाठी शिव-हरी द्वयीतील पंडित हरीप्रसाद चौरसिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. विषेशतः चांदनी, ‘सिलसिला’, डर या चित्रपटाच्या संगीतात शिवकुमार शर्मा यांनी खुबीने संतूर वादनाचा केलेला वापर आजही तितकेच श्रवणीय आणि आल्हाजदायक वाटते.
‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.
Tags pandit shikumar sharma is no more pandit shivkumar sharma santoor maestro shivkumar sharma