Breaking News

खळखळून हसविणाऱ्या राजू श्रीवास्तवची भूतलाच्या रंगमंचावरून दु:खद एक्झीट निधनाने सर्वच स्थरातून हळहळ

धकाधकीच्या जीवनामुळे मागील काही वर्षांमध्ये व्यक्तींच्या जीवनातून खळाळून हसणे जवळपास लुप्त होत चालले आहे. मात्र त्यातही काही काळ आपल्या धकाधकीचा ताण- तणाव, दु:ख, चिंता विसरायला लावणारा आणि जीवनातील निखळ विनोदांचा आस्वाद घ्यायला लावत खळाळून हसायला भाग पाडणारे विनोदी कलावंत राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ वर्षी आज सकाळी अखेरचा श्वास घेत जगाच्या रंगमंचावरून दु:खद एक्झीट घेतली.

गेल्या महिन्यात १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. परंतु आज त्यांची प्राणज्योत मावळली.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची माहिती कळताच बॉलीवूडमधील सिताऱ्यांसह, राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी शोक वाहत त्यांना श्रध्दांजली वाहीली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे, अशा शब्दांत अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.

‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे, असल्याची मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

राजू श्रीवास्तव यांची कारकिर्द

राजू श्रीवास्तव, ज्यांना गजोधर आणि राजू भैया म्हणूनही ओळखले जाते, ते एक भारतीय विनोदी कलाकार, अभिनेता आणि राजकारणी आहेत. २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात त्यांचा जन्म झाला. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना बलाई काका म्हणत.

राजू सुरवातीपासून नक्कल फार उत्तम करत असल्याने त्यांना विनोदवीरच व्हायचे होते. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांनी कानपूरहुन थेट मुंबई गाठली. ऐंशीच्या दशकात एकीकडे हिरोच्या बरोबरीने एक विनोदवीर नट लागत असे. जॉनी लिवर देखील याच काळात नावारूपास आले.

जॉनी लिवर यांनी देखील खडतर प्रवास करून बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावले. राजू यांनी सुरवातीच्या काळात मनोरंजन क्षेत्रात काम मिळत नव्हते, तेव्हा काही काळ रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला होता. राजूंचा पहिला चित्रपट म्हणजे एन चंद्रा यांचा तेजाब, त्यातील बऱ्यापैकी कलाकार हे नवखे होते. चित्रपट सुपरहिट ठरला.

पुढे मैने प्यार किया, बाजीगर, आमदनी आठन्नी खर्चा रुपया, बिग ब्रदर, मै प्रेम कि दिवानी हू, बॉम्बे टू गोवा यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. मात्र राजू यांची खरी ओळख म्हणजे स्टँडअप कॉमेडियन. सुरवातीच्या काळात विनोदी कार्यक्रमांचे त्यांना अवघे ५० रुपये मिळत. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमातून त्यांनी विनोदी जगात पाऊल ठेवले.

राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. राजू श्रीवास्तव यांचा ‘गजोधर भैया’ हे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. या व्यतीरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी शक्तीमान, बिग बॉस, कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

राजकारणात प्रवेश

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना कानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र ११ मार्च २०१४ रोजी त्यांनी तिकीट परत केले आणि सांगितले की, त्यांना पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमधून त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या, मात्र राजू यांनी कायमच स्टँडअप कॉमेडीला प्राधान्य दिले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *