Breaking News

“या” पाच महापुरूषांवर महानाट्य

महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना  हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी  दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ५९ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे मंचावर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी पारितोषिक प्राप्त रंगकर्मींचे अभिनंदन करून, नाट्य क्षेत्रासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यात यापूर्वी  दोन नाट्यविषयक प्रशिक्षणे आयोजित केली जात होती, त्यांची संख्या आता १२ करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री मुनगंटीवार यांनी केली. बालनाट्य स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरण निश्चित करणे, राज्य नाट्यस्पर्धेतील पारितोषिक रक्कम वाढविणे, परीक्षकांचे मानधन वाढविणे यांचाही प्राधान्याने विचार करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवांवर महानाट्ये करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्मीळ नाटकांच्या संहिता जपणे व त्या नाटकांचे रंगमंचावर चित्रीकरण करून त्यांचे जतन करण्याबाबतही निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या वर्षापासून राज्यातील स्थानिक बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धा व महोत्सव सुरू करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.

सांस्कृतिक विभागाचे वार्षिक कार्यक्रम वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याने कलावंत आणि त्यांच्या संस्था यांना योग्य वार्षिक नियोजन करता येईल व त्यातून दर्जेदार निर्मिती प्रेक्षकापर्यन्त पोहोचेल असे ते म्हणाले.

हॅप्पीनेस इंडेक्स ही सांस्कृतिक विभागाची जबाबदारी

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले की, “इकॉनॉमिक ग्रोथ” तर हवीच, सोबत “हॅप्पीनेस इंडेक्स ” वाढावा यासाठी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. धनाने भौतिक साधन-सुविधा मिळविता येतील, मनाच्या समाधानासाठी, त्याचं मूल्यांकन करण्यासाठी सांस्कृतिक संपन्नता आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही मराठी भाषिक राज्ये यामध्ये मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील नाट्य चळवळीचे आणि रसिकांचेही श्री मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक यावेळी केले.

सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी जाईल

राज्यातील हौशी रंगभूमी, कलावंत तसेच व्यावसायिक मंच या सर्वाना योग्य संधी उपलब्ध व्हावी; नाटय़गृहे प्रशस्त व अद्ययावत व्हावीत, त्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य होईल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *