Breaking News

राज्यात चित्रपटगृहे, नाट्यगृहे २७ दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी

मागील दिड वर्षापासून कोरोना लाटांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आली. परंतु मधल्या काळात ५०% क्षमतेने ही गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोंबर २०२१ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात मात्र लवकरच एसओपी जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

काल शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आणखी १० दिवसानंतर अर्थात ४ ऑक्टोंबरपासून नवरात्रोत्सावाच्या पहिल्या दिवसांपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे-प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देत त्यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात आली. त्याचबरोबर कालच राज्यातील ७ ऑक्टोंबरपासून शाळा प्रत्यक्ष भरविण्यासही मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला परवानगी देत विद्यार्थी, पालक आणि शाळांसाठीची नियमावली जारी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २७ दिवसांनंतर अर्थात २२ ऑक्टोंबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली.

कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात राहीली असल्याने आणि जर अचानक संख्या वाढली तर त्याचा सामना करण्याच्यादृष्टीने यंत्रणांची तयारी करण्यात आल्याने अखेर सर्व गोष्टी पुन्हा एकदा पहिल्यासारख्या सुरळीत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी झटपट निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आगामी वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांनाही सामोरे जावे लागणार असल्याने राज्यात अनेक गोष्टी पुन्हा सुरु करून नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे राजकिय क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील “देव”ने घेतली पडद्यावरून एक्झीट ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देव म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचा दोनच …

Leave a Reply

Your email address will not be published.