सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन चाललेला दिसत आहे.
एफआयआरनुसार, सैफ अली खानवर हल्ला पहाटे २ वाजताच्या सुमारास झाला जेव्हा घुसखोर अभिनेत्याचा धाकटा मुलगा जेहच्या बेडरूममध्ये घुसला. घरातील नोकराने अलार्म वाजवल्यानंतर सैफने हस्तक्षेप केला त्यावेळी घुसखोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खानवर घुसखोराने सहावेळा चाकूने वार केले. त्यातील एक वार सैफ अली खानच्या मणक्यापासून काही अंतर अलिकडे लागला, तसेच ज्या चाकूने सैफवर हल्ला करण्यात आला त्या चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या पाठीतच अडकून राहिला. हा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून शरिरातून बाहेर काढल्याची माहिती लीलावती रूग्णालयाच्या पथकाने दिली.
सुमारे ३० मिनिटे चाललेल्या या घटनेनंतर, हल्लेखोर पहाटे २.३३ वाजता पुन्हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता कारण त्याच्या गळ्यात कापड (लाल गमचा) गुंडाळलेला दिसत होता.
सैफ अली खान , त्याची पत्नी करिना आणि त्यांची दोन मुले राहत असलेल्या सतगुरु शरण इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तो पायऱ्या उतरताना दिसत आहे. अभिनेता १२ व्या मजल्यावर राहतो.
सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर, चाकू काढून टाकण्यासाठी आणि गळणाऱ्या पाठीच्या कण्यातील द्रवपदार्थ थांबविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेता आता धोक्याबाहेर आहे. सैफ व्यतिरिक्त, घरातील इतर दोन नोकरांनाही घुसखोराने हेक्सा ब्लेडने हल्ला केल्याने दुखापत झाली आहे.
तथापि, मुंबईच्या एका उच्चभ्रू परिसरात घडलेल्या घटनेला ३६ तासांहून अधिक काळ उलटूनही पोलिसांना अद्याप संशयिताला पकडता आलेले नाही, ज्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकरांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई पोलिसांनी घुसखोराचा शोध घेण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी ३५ पथके तयार केली आहेत. शुक्रवारी, पोलिसांनी हल्ल्याच्या संदर्भात एका संशयिताला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांकडून एका संशयिताला पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले, या संशयिताची आज दिवसभर चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास या संशयातित तरूणाला सोडून देण्यात आले.
दरम्यान, पोलिस सूत्रांना संशय आहे की हल्लेखोराने १४ जानेवारी रोजी शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या निवासस्थानाचीही रेकी केली होती. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.