तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २: द राइज’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुनने सांगितले की, त्याला दुसऱ्या दिवशी महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.
अल्लू अर्जुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडील अल्लू अरविंद आणि वकिलांसह चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. सूत्रांनी सांगितले की, अल्लू अर्जुनने न डगमगता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि तो सहकार्य करत होता.
पुष्पा २ स्टार अल्लू अर्जून यांना विचारण्यात आले की चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहण्यासाठी पोलिसांची परवानगी नाकारण्यात आली होती का, याची माहिती त्याला होती. संध्या थिएटरमध्ये त्याच्या आगमनानंतर त्याच्या पीआर PR टीमने त्याला परिस्थिती समजावून सांगितली का, असे प्रश्न त्याला विचारण्यात आले.
अल्लू अर्जुन आणि त्याचे वकील अशोक रेड्डी यांच्यासह चौकशीला उपस्थित होते. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) रमेश आणि सर्कल इन्स्पेक्टर राजू यांच्या देखरेखीखाली ही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अल्लू अर्जुनला पुन्हा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी या अभिनेत्याला चेंगराचेंगरीच्या ठिकाणी (संध्या थिएटर) नेले जाऊ शकते, असेही यावेळी सांगितले.
प्रश्नांच्या दरम्यान, थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी लोकांना योग्य रीतीने आवारात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतानाही थिएटरमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. एका ठिकाणी, एक माणूस लाकडाची काठी घेऊन गर्दीला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, परंतु लोक त्याला धक्काबुक्की करत ढकलत आहेत.
दरम्यान, उस्मानिया विद्यापाठाच्या जवळ असलेल्या अल्लू अर्जुनच्या घराबाहेर काहीजणांनीआंदोलन करत अल्लू अर्जूनच्या घराबाहेर असलेल्या वस्तूंची तोडफोड केली. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जूनच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती, तसेच पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली होती,
४ डिसेंबर रोजी पुष्पा २ च्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून अल्लू अर्जुनला मंगळवारी पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. अभिनेत्याने यापूर्वी सांगितले होते की, तो तपासात सहकार्य करणार म्हणून.
चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनने अल्लू अर्जुनला बजावलेल्या नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले होते.
४ डिसेंबर रोजी, पुष्पा २ चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या वेळी झालेल्या चेंगराचंगरीच्या घटनेत रेवती या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. तसेच त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्लू अर्जूनची झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केल्याने ही घटना घडली.
या घटनेनंतर, पोलिसांनी अभिनेता, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी या प्रकरणात अटक करण्यात आली होती. नंतर त्याच दिवशी त्याला तेलंगणा उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला होता. त्यानंतर १४ डिसेंबरला सकाळी त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली.
अल्लू अर्जुनने पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली, तर पुष्पा २च्या निर्मात्यांनी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.