Breaking News

गोंविदाच्या ‘साजन चले ससुराल’चा सिक्वेल येणार

मुंबई : प्रतिनिधी

सध्याचा जमाना सिक्वेल चित्रपटांचा आहे. आज केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठीतही गाजलेल्या सिनेमांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या जुन्या चित्रपटांमधील कथानकात पुढे काय घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांच्या ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटानेही त्या काळात प्रेक्षकांवर जादू केली होती. ‘साजन चले ससुराल २’च्या रूपात सिद्दीकी यांनी आता ‘साजन चले ससुराल’चा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

‘साजन चले ससुराल २’चे दिग्दर्शन स्वत: मन्सूर अहमद सिद्दीकी करणार आहेत. अनास फिल्म्स मुव्हीज या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत ‘साजन चले ससुराल २’निर्मिती केली जाणार असून या हिंदी चित्रपटासोबत सिद्दीकी ‘राधे मुरारी’ हा मराठी चित्रपटही बनवणार आहेत. लवकरच दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ९०च्या दशकात गाजलेल्या ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटात गोविंदा, करिश्मा कपूर आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘साजन चले ससुराल २’मध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट ‘अल्लरी मोगुडू’ या तमिळपटाचा हिंदी रिमेक होता. एन. एन. सिद्दीकी यांची निर्मिती असलेल्या ‘साजन चले ससुराल २’ आणि ‘राधे मुरारी’ या दोन्ही चित्रपटांची घोषणा लवकरच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. त्याच वेळी कलाकारांच्या नावांचेही पत्ते ओपन केले जाणार आहेत. डेव्हीड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘साजन चले ससुराल’मधील ‘राम नारायण बाजा बजाता…’, ‘दिल जान जिगर तुझपे निसार…’, ‘बाय बाय मिस गुड नाईट…’ आदी गाणी खूप गाजली होती. सुमधूर गीतसंगीताची हीच परंपरा पुढे सुरू ठेवत ‘साजन चले ससुराल २’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट देण्याचा सिद्दीकी यांचा मानस आहे. ‘साजन चले ससुराल २’प्रमाणेच ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाच्या स्टारकास्टबाबतही कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

सिद्दीकी यांनी ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटासोबतच ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटात एका गावाकडच्या तरुणाची दुहरी प्रेमकथा पाहायला मिळाली होती, पण आता काळ बदलला आहे. त्यामुळे ‘साजन चले ससुराल’च्या सिक्वेलच्या कथानकात काळानुरूप उचित बदल करण्यात आले आहेत. ‘साजन चले ससुराल’मध्ये गोविंदाने आळवलेला हिट चित्रपटाचा सूर ‘साजन चले ससुराल २’मध्ये कोण आळवणार याची उत्सुकता आहे. यासोबतच चित्रपटात दोन नायिका असणार की एकच हे देखील कुतूहलाचे ठरणार आहे.

Check Also

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *