Breaking News

चित्रपट आणि मनोरंजनास उद्योगाचा दर्जा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, चित्रपट व मनोरंजन क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती मिळण्यास मदत होईल तसेच अर्थव्यवस्थेस बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. चित्रपट व करमणूक उद्योगाची व्याप्ती मोठी आहे. चित्रपट आणि करमणूक उद्योगाला प्रोत्साहन आणि गतीशीलता देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत चित्रपट आणि करमणूक क्षेत्रासाठीचे धोरण आणि या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत काम करण्यात येत आहे. दूरदर्शन, डिजिटल मिडीया, लाईव्ह इव्हेंट, ॲनिमेशन, आऊट ऑफ होम मिडीया, सिनेमा, रेडिओ यांच्यासह अनेक बाबींचा यामध्ये समावेश आहे.
चित्रपट (शॉर्ट फिल्मस/ ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणारे सिनेमे) आणि मनोरंजन क्षेत्र मोठया प्रमाणावर विस्तारले असून या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे गरजेच आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच,लोककला, माहितीपट, जाहिरातपट यासाठीही धोरण तयार करण्यात येत असून त्या धोरणाचे प्रारुप तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *