Breaking News

श्रीदेवी यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात? शवविच्छेदनात अपघाती मृत्यूची नोंद : ‘चांदणी’ला शेवटचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटीजची गर्दी

मुंबई: प्रतिनिधी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दुबईहून धडकली आणि बॅालिवुडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना जणू ‘सदमा’च बसला. श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे काल दिवसभर आणि आज दुपारपर्यंत सांगितले जात होते; परंतु शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीदेवी यांनी बेशुद्धावस्थेत पाहणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांचे पती बोनी कपूर यांचा जवाब पोलिसांनी नोंदवून घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार श्रीदेवी फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या, पण जवळजवळ १५ मिनिटे बाहेर आल्या नाहीत. आतून काहीच हालचाल होत नसल्याने बोनी यांनी दरवाजाला धक्का देत आत प्रवेश केला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर धावपळ करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालातही या मृत्यूची अपघाती नोंद करण्यात आली आहे. श्रीदेवी यांच्या रक्तात अल्कोहोलाचे अंश आढळल्याने त्या बाथटबमध्ये पाय घासरून पडल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवालात कुठेही श्रीदेवी यांच्या मृत्यूसाठी हृदयविकाराचा झटका कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी परवानगी दिली असली तरी प्रॅासिक्युशन मेजिस्ट्रेट यांच्याकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत असल्याचे समजते. प्रॅासिक्युशन मेजिस्ट्रेट यांचे पत्र मिळाल्याशिवाय पार्थिव भारतात आणता येणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान श्रीदेवीचा पार्थिव संध्याकाळी उशीराने मिळाला असून २८ तारखेच्या पहाटेपर्यंत तीचा मृतदेह भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी वर्सोवा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कपूर कुटुंबियांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अनिल कपूर यांच्या घरी सेलिब्रिटीजची गर्दी :

अनिल कपूर यांच्या घरी सेलिब्रिटीजची गर्दी जमू लागली आहे. रजनीकांत काल रात्रीच मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या मागोमाग कमल हासनही चेन्नईहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. माधुरी दीक्षित, हनी ईराणी, दीप्ती नवल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, करण जोहर, फरहान अख्तर, सरोज खान, फराह खान, तब्बू, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जी, शबाना आझमी, रेखा, अर्जुन कपूर आदी सेलिब्रिटीजनी अनिल कपूर यांचे घर गाठले आहे. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी ‘१०२ नॅाट आऊट’चे चित्रीकरण रद्द केले असून श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहेत. ‘मॅाम’ या सिनेमात श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री सजल ‘अलीने पुन्हा एकदा आपण आईला मुकल्याचे’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मॅाम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सजलच्या आईचे निधन झाले होते तेव्हा श्रीदेवी यांनी सजलला आईप्रमाणे प्रेम देत सावरले होते.

आवडत्या पांढऱ्या रंगाने सजणार अंत्ययात्रा :

तूर्तास श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीदेवी यांना पांढरा रंग खूप आवडायचा. रुपेरी पडद्यावर तसेच खाजगी जीवनातही खूप वेळा त्या पांढऱ्या रंगाच्या कॅास्च्युममध्येच दिसायच्या. पांढरी फुलं, पांढरे कपडे, पांढरी ज्वेलरी वगैरे श्रीदेवी यांना नेहमीच भुरळ घालायचे. हीच गोष्ट ध्यानात घेऊन त्यांच्या अंत्ययात्रेतही पांढऱ्या रंगाला महत्त्व देण्यात येत आहे. यासाठी पांढऱ्या वस्त्राचा तसेच फुलांचा उपयोग करण्यात येणार आहे.

Check Also

परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने लिहिली खास पोस्ट राघव चड्डा याची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट

अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला जन्मदिवस आपला पती रागाव चड्डा याच्या सोबत साजरा करत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *