Breaking News

सर्व समाजातील घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्याचे शरद पवारांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे असे आवाहन करतानाच शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देत असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.

मागील सात दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात संपाचे हत्यार उपसले असून ७ जून पासून शहरांचा भाजीपाला तोडण्याचा इशाराही दिला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागोजागी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील. पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षात झालेली नाही. सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी काही पहिल्यांदाच करत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांत कधी दिल्लीला, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्य प्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात शेतकरी सातत्याने रस्त्यावर येवून आपली भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आणि ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे सांगितले की, आम्ही या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहोत. त्यांनी असेही सांगितले की सरकार मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देखील करणार आहे. ही अंमलबजावणी आजही होत नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. माझी देशवासियांना विनंती आहे की, बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील इतर घटकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे. हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाचा कार्यक्रम नाही. शेतकऱ्यांच्या या संघर्षाला साथ दिली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी दुध रस्त्यावर ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हा प्रकार टाळता आला तर टाळावा. गरीब वर्गात हा माल वाटावा याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि सरकारला तुमचा आक्रोश या माध्यमातून दिसेल गरीबांची सहानुभूती आपल्याला मिळेल. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये. हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवायचा नाही. राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा शब्द पाळला नाही. शब्द पाळण्याची त्यांची नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *