नागपूरः प्रतिनिधी
राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर बसलय. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांची अजूनही फसवणूकच करण्यात येत असून कर्जमाफीची घोषणा अद्याप केली नाही. उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ ५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते.
विद्यमान सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांना माहित आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीसाठी भरपाई देण्याची केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या नियमात तरतूद नाही. तरीही आम्ही शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई दिली. परंतु या सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केवळ ५ हजार कोटींची तरतूद केली असून तिजोरीतून भरपाई रक्कम देण्याची तरतूदच केली नसल्याचा टीका त्यांनी केली.
आमच्या सरकारच्या काळात विकासकामांसाठी कर्जे घेण्यात आली. मात्र त्या त्या कर्जांची जबाबदारी त्या त्या संस्थांकडे असून मुंबईतील मेट्रो उभारणीसाठी घेतलेले कर्ज मेट्रो कार्पोरेशनकडूनच फेडण्यात येते. हीच पध्दत इतर संस्थाची आहे. तरीही या सरकारकडून राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत राज्यावर असलेल्या कर्जाची नवी आकडेवारी जाहीर करण्यात येत असून जाहीर केलेली आकडेवारी खोटी असल्याचे त्यांनी सांगितले.
