Breaking News

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी राज्य सरकारने मागितले केंद्राकडे २ हजार ४२५ कोटी रूपये

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कापवरील बोंड अळी आणि ओखी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याना ३० हजार आणि बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३७ हजार ५०० रूपये प्रती २ हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली. तसेच ओखी वादळामुळे कोकणातील आंबा, काजूच्या शेतकऱ्यांना ४३ हजार रूपये आणि पालेभाज्या उत्पादन शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रूपयांची मदत देण्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी जाहीर केले. मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडे मदत मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दोन्ही नैसगिक संकटात नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. यातील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी पत्र दिले आहे. त्याद्वारे हजार ४२५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मागण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

याबाबत पाटील म्हणाले, राज्यात कापसावर बोंडअळी तसेच धानावर तुडतुडे अळी त्याचप्रमाणे समुद्रातील ओखी वादळामुळेही किनारपट्टी भागातील पिक व फळ बागांचे नुकसान झाले होते. या सर्व घटनांचे पंचनामे करण्यात येत आहेत. ही मदत तातडीने मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत.

 

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *