Breaking News

फडणवीस म्हणाले, फक्त परमबीर सिंग यांची चौकशी करणार कि गृहमंत्र्याचीही? पवारांना दोष देणार नाही ते निर्माते असल्याने त्यांना सरकारचा बचाव करावा लागणार

नागपूर: प्रतिनिधी

ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची केवळ ते चौकशी करणार का? कि गृहमंत्र्यांचीही चौकशी करणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना करत १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांची पत्रकारपरिषद मी पाहिली, ते म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार म्हणाले ते खरे आहे पण ते अर्धसत्य असल्याची टीका केली.

नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

त्यांनी ज्यावेळी हे सांगितलं की वाझे यांना परमबीर सिंग यांनी घेतलं, हे खरंच आहे. परमबीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोकं होते, त्यांनी निर्णय घेतला वाझेंना परत घेतलं. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय सरकार झोपलं होतं का? सरकारला माहिती नव्हतं? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का? एखादा निलंबित असलेला व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतला, तर त्याला महत्वाचं अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही? एवढं नाही, तर सगळ्या महत्वाच्या केसेस, या त्यांच्याचकडे देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं का? असा सवाल करत होय, शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरच आहे परमबीर सिंग यांच्याच समितीने वाझे यांचं निलंबन रद्द करून, त्यांना पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने व निर्देशाने हे काम परमबीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी पाहिल्याचे ते म्हणाले.

आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते असेही त्यांनी सांगितले.

एपीआय वाझे यांच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत आणि त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केला आहे. हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. पण अशाप्रकारचा खुलासा करणारे, परमबीर सिंग हे पहिले व्यक्ती नाही. या पूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे. मात्र त्यावर राज्य सरकारने कोणतीच कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या बदल्यांमधलं रॅकेट पैशांची देवाणघेवाण त्यातली दलाली, या संदर्भातील संपूर्ण ट्रान्सक्रीप्टसह एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. तेव्हाच्या कमिशनर इंटलिजन्सच्या माध्यमातून तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही. ती कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती असेही त्यांनी सांगितले.

तसेच सचिन वाझे यांच्याकडे असलेल्या गाड्या कोण कोण वापरत होते याचीही चौकशी झाली पाहिजे. याशिवाय गृहमंत्र्यांना पदावरून हटविल्याशिवाय त्यांची चौकशी करता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांचा राजीनामा होईपर्यत भाजपा आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *