Breaking News

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी
राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य असल्याचे सांगत नोटबंदीचे ५० दिवस संपेचीना, स्मार्ट सिटी बनेची ना, रोजगाराच्या संधी निर्माण होईची ना सारखी विडंबनात्मक उत्तरे देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिरफाड केली.
विधानसभेत राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणावरील प्रस्तावावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका करत अनेक उद्विग्न प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यासह ५१ सदस्यांनी याप्रश्नी आपली मते मांडली. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
मी दिलेला शब्द पाळतो. तसे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविणार असा शब्द दिला नव्हता. तसे भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही असाही शब्द दिला होता अशी आठवण करून देत बाळासाहेबांना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असा शब्द दिला होता. आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला आणि टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट करत पण तुम्हाला माझ्या शब्द देण्याचे कौतुक कधीपासून व्हायला लागले असा खोचक सवालही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
राज्यावर कर्जाचा डोंगर मोठा आहे. राज्याचे नाव खराब करणार नाही. मात्र महाराष्ट्राचा अभिमान वाटेल आणि महान बनेल असे काम करणार असल्याचा त्यांनी पुनःरूच्चार केला.
आम्ही कमी बोलतो आणि काम जास्त करतो. साधू संतांची शिकवण ही तशीच असल्याचे सांगत मी जास्त चालतो पण वेळ नाही. त्यामुळे ट्रेंड मिल वरती चालतो. तासनतास चालतो घाम गाळतो. पण त्याच ठिकाणी थांबतो. तसे अनेक जण खूप घोषणा करतात मात्र पुढे जाताना दिसत नाहीत अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.
धर्म ही सांगायची गोष्ट नाही तर जगायची गोष्ट आहे असे गाडगे महाराज सांगायचे. माझ्या हातात जो कागद आहे तो मंत्रालयात मोठा करून लावणार आहे. मध्यंतरी तो पिचर आला होता. “नया है वह वो” तस माझं आहे शिकतोय मी, देवेंद्र जी तुमच्याकडून शिकायचं आहे मला. काल सुधीर मुनगंटीवार म्हणाले उद्धवा अजब तुझे सरकार, पण त्यांना मी सांगू इच्छितो की सुधीर होऊ नका अधीर तुमचं सरकार गेल्यामुळे तुम्ही झालात बेकार आणि आमचं अजब सरकार आलंय असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.
जनादेश बोललात पण आम्ही धर्म आणि राजकारण वेगळं पाहत होतो. पण धर्मराज्यात राजा ही हरला होता. आमचं सरकार गोरगरीबांच आहे. त्यामुळे आम्हाला रिक्षा परवडते, बुलेट ट्रेन परवडत नाही, असे सांगत बुलेट ट्रेनला पूर्णविराम देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
श्रीराम लागू यांच्या सामनामध्ये गाणं होत कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं तस अनेक वर्षे हे ओझं आम्ही वाहत आलो. आता ते आम्ही सोडलं असल्याचे सांगत भाजपा ही शिवसेनेवरच ओझ होत अस त्यांनी स्पष्ट केले.
स्थगिती नव्हे प्रगती सरकार
आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकास कामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील.
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार
गोरगरिबांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात आम्ही सुधारणा करण्यावर भर देणार आहोत. शेतकरी, महिला यांच्या समस्या आमच्या दृष्टीने प्राधान्याच्या राहतील. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थिती देखील जनतेसमोर आणणार आहोत, असेही ते म्हणाले.
मराठी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही
राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा लौकिक आणखी वाढवूया असेही ते म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार असून कर्नाटक व्याप्त प्रदेशातील मराठी बांधवांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे.
राज्यात मंदीमध्ये गुंतवणूक वाढीचे आव्हान
महाराष्ट्राचा उद्योगामध्ये देशात चांगला लौकिक आहे, पण सध्या मंदीचे वातावरण असून राज्यात गुंतवणूक वाढीचे मोठे आव्हान आहे. विविध कारणांमुळे ही परिस्थिती असून आमचे सरकार सर्वांच्या सहकार्याने यातून मार्ग काढेल, असेही ते म्हणाले.
गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणे काम करणार
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात संत गाडगेबाबा यांच्या वचनांचा उल्लेख केला. गाडगेबाबांना अभिप्रेत असलेल्या धर्माच्या संकल्पनेनुसार राज्य कारभाराची दिशा ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपल्या जबाबदारीची जाणीव कायम राहावी म्हणून मंत्रालयातील आपल्या दालनात गाडगेबाबांचे हे विचार प्रदर्शित करण्यात येतील. या विचारांना अनुसरून बेरोजगारांना रोजगार, अंध-अपंगांना औषधोपचार, सामान्य जनांचे शिक्षण आणि जनतेला मूलभूत सुविधा देणारे हे सरकार असेल.
बाहेरचे हिंदू देशात घेणार त्यांची काळजी घेणार कोण, शेतकरी संपावर गेले तरी फरक नाही पडत आवाज वाढवू नका सरकारकडे काय पैसे छापण्याची मशीन आहे का, आत्महत्या करणं फॅशन झाली असे कोण म्हणले होते
माझ्या महाराष्ट्रातील माता आणि बाजूला जाऊन खाता असे म्हणत भाजपाच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.
जी भाषण झाली त्यात खरचं अभिभाषणवर चर्चा झाली यावर मला माहित नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणार कर्जमाफी करणार असल्याचे सांगत सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेतही दिले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *