मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अनुक्रमे विधानसभाध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र त्यांच्या निवडीचे स्वागत करताना भाजपाने बाके वाजवून केले तर सत्ताधारी बाकावरील शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचे उट्टे काढत फडणवीस यांना चिमटे आणि टोले लगावत त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना २५-३० वर्षापासूनचे जे विरोधक होते. ते आता मित्र झालेत. तर जे मित्र होते, ते आता विरोधक झाल्याचे सांगत मित्रत्व जपले असते तर मी घरात बसून हा सोहळा पाहीला असता असे सांगत आपले हिंदूत्व एकच असल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर मंत्री जयंत पाटील बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द ही वार्ड अध्यक्षपासून झालेली आहे. त्यानंतर ते नागपूर पश्चिमचे प्रसिध्दीप्रमुख होते. मात्र राज्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाला आणि सरकारचे जे काम केले असे सांगत आम्ही सत्तेत असताना अजित पवार आणि मी (जयंत पाटील) भरपूर काम केले. त्याची प्रसिध्दी करण्याच्या निधीकरीता बाबाकडे (त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण) यांच्याकडे फाईल पाठवित असे. मात्र ते यासाठी कधीच निधी मंजूर करत नव्हते. पण तुम्ही ते केलात असे सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
या ठरावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, जेव्हा-जेव्हा सरकारचे नियमानुसार काम होणार नाही. अथवा संविधानातील तरतूदीनुसार काम होणार नाही. तेव्हा सरकारवर आसूड ओडल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्ष म्हणजे केवळ शत्रु नाही. तर वैचारीक विरोधाकरीता एकमेकांचे विरोधक म्हणून बसलो आहोत. पार पडलेल्या निवडणूकीत आम्हाला ७० टक्के जागा मिळाल्याने आम्ही मेरीटमध्ये आलो. मेरीटमध्ये येवूनही ४० टक्के जागा मिळाल्या ते आता मेरीटच्या जागी जावून बसले.
मी पुन्हा येईन म्हणालो होतो. राज्यातील जनतेने आम्हाला आणलय म्हणून आम्ही आल्याने ते म्हणणे सार्थ ठरत असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करणार. मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज दिला तरी माझी भूमिका सकारात्मक राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
