Breaking News

‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष सरकार उत्साहात साजरा करणार नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी,  प्रसिध्द कवी, पटकथा आणि संवाद लेखक ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा तसेच लोकप्रिय लेखक, नाटककार, कथाकार पु.ल.देशपांडे अर्थात पु. लं. यांचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या महनीय व्यक्तींच्या कार्यांचा गौरव व्हावा यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनामार्फत साजरे करण्यात येणार आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत. या समितीमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव हे सदस्य आहेत. तर मराठी भाषा संचालनालयाचे संचालक, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष  हे सुध्दा या समितीमध्ये सदस्य आहेत. या समितीमध्ये काही मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू ऊर्फ राजदत्त, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. प्रकाश आमटे, कवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, संगीतकार अशोक पत्की, संगीतकार श्रीधर फडके, दिनेश ठाकूर, श्रीधर माडगुळकर, आंनद ग. माडगुळकर, भीमराव पांचाळे, हरिश्चंद्र बोरकर, अभिनेते किशोर कदम, संगीतकार अजय आणि अतुल गोगावले, आशा बगे, पुरुषोत्तम लेले  हे सुध्दा या समितीचे सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

या समितीने जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाची रुपरेषा ठरविल्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विविध कार्यक्रमाचे आयोजन करतील. या समितीमध्ये आवश्यकतेनुसार इतर मान्यवरांचाही समावेश करण्यात येईल.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *