Breaking News

प्रायोगिक रंगभूमीसाठी जानेवारी २०२० पासून नवा रंगमंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रंगमच निर्मितीचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी
प्रायोगिक रंगभूमीसाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील रंगमंच येत्या जानेवारी २०२० पासून सुरु होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आज सकाळी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आदी उपस्थित होते.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रायोगिक रंगभूमी टिकून राहावी यासाठीच जानेवारी २०२० पर्यंत हा रंगमंच सुरु करण्यात येणार आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य मिळावे, चांगले कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून येथील आसनव्यवस्था रंगमंचाला पूरक अशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या रंगमंचावर दरवर्षी साधारण २०० प्रयोग करण्याचे उद्दिष्ट असेल. प्रायोगिक नाटय़ चळवळीमध्ये एक वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशातून हा रंगमंच नक्कीच मदत करेल असा विश्वास व्यक्त करत प्रायोगिक रंगभूमीसाठी निम्म्या दरात रंगमच उपलब्ध करुन देणे, प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे हे महत्वाचे असल्यानेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पाचव्या मजल्यावर प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्माण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नाटकासाठी आवश्यक असणारे साहित्य आणण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक स्वतंत्र लिफ्टची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय येथे रंगमंच सुरु करीत असताना आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यावरही भर देण्यात येणार आहे. रंगमंचासाठी आवश्यक असणाऱ्या संगीत, गायन, नेपथ्य, रंगभूषा अशा तज्ज्ञांची समिती करण्यात आली असल्याने रंगमंच अधिकाधिक चांगला होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल प्रायोगिक रंगभूचीचा प्रस्तावित रंगमच
१. ३९१ दर्जेदार आसने
२. ‍डिजीटल सिनेमा प्रोजेक्टर
३. आधुनिक तंत्रज्ञानाची युक्त प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था
४. दर्जेदार ध्वनी शोषक (अकौस्टिक्स) प्रणाली
५. सुसज्ज मेकअप रुम
६. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष
७. सेंटरलाईज्ड वातानुकुलन
८. भव्य स्टेज
९. भव्य स्क्रिन व आधुनिक स्टेज ड्रेपरी
१०. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय
११. २ उद्वाहने
१२. अग्नीशमन यंत्रणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *