Breaking News

माजी सैनिकांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या विकासात सैनिकांचे योगदान अढळ राहिले आहे. ज्या ज्या वेळी देश संकटात सापडला त्या त्या प्रत्येक वेळी देशातील सैनिकांनी जीवाची बाजी लावत परकीय शत्रूंपासून देशाचे रक्षण केले आहे. केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर देशातील आपत्कालीन परिस्थितीतही  सैनिकच नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असतात. देशासाठी आजपर्यंत हजारो वीरांनी बलिदान दिले आहे. युद्धभूमीवर शत्रूशी लढताना प्राण गेला तरी बेहत्तर पण माझा देश वाचला पाहिजे, यासाठीच आपलं आयुष्य वेचणारे सैनिकच या राष्ट्राचे खरे तारणहार  आहेत. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई व्हावे असे सरकारला मनोमन वाटत असेल तर त्यांनी  प्रत्येक जिल्ह्यात सैनिकांसाठी राखीव जागा ठेवत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची निवड करावी.

कारगिल विजयी दिनी घोषणा करा

देशाच्या इतिहासात २६ जुले हा कारगिल विजयी दिवस अभिमानास्पद असून सरकारने या दिवशीच माजी सैनिकांची  ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करत कारगिल युद्धात शाहिद झालेल्या शूरवीरांना अनोखी मानवंदना द्यावी, अशी मागणीही हांडे यांनी व्यक्त केली आहे.

 कोरोना काळातही खांद्याला खांदा

कोरोना काळात ज्यांनी काम करणे आवश्यक होते अशा अनेक संबंधित घटकांनी आपली जबाबदारी झटकत यातून पळ काढला; मात्र राज्यातील माजी सैनिकांनी जबाबदारीची जाणीव ओळखून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कोरोना संसर्गाची भीती असतानाही हे रणभूमीवरचे योद्धे कोरोनाविरुद्ध लढताना मागे हटले नाहीत.त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी लक्ष्मीकांत हांडे यांनी या निवेदनाद्वारे केली.

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *