Breaking News

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार

मुंबईः प्रतिनिधी
ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, बी. जे. कोळसे पाटील, विद्या चव्हाण, बाळासाहेब थोरात, कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांनी मतदान केलेलं आहे, त्यालाही आपण त्याच उमेदवार आणि चिन्हाला मतदान केलं आहे का हे समजलं पाहिजे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
या सर्वपक्षीय मोर्चापूर्वी राज्यातील नागरिकांना एक फॉर्म देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करण्यात येईल. जे लोक हे फॉर्म भरतील त्यांचे नाव, नंबर, पत्ता असं सगळं भरुन घेतलं जाणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पुढील काही दिवस ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे सगळे फॉर्म गोळा करुन २१ ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढला जाईल. लोकांकडून गोळा केलेले हे सगळे फॉर्म महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांना देण्यात येतील अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच मुंबईतील मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदारसंघांत घोळ आहे. ५४ लाख मतं वाढीव आहेत. त्यामुळे EVM विरोधात प्रत्येक राज्यांराज्यांत उठाव होणार आहे. जर २००च्या पुढे जागा जिंकण्याचा विश्वास आहे, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे. मी निवडणूक आयोगाला विचारलं ईव्हीएमची चिप कुठे बनते, ते म्हणाले अमेरिकेत. ज्या अमेरिकेत गोंधळ सुरू आहे, त्या अमेरिकेत चिप बनते त्यावर आमच्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा?, असा सवालही त्यांनी केला.
यापुढे आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह दिसणार नाही. आम्ही महाराष्ट्रात लोकांच्या घरोघरी जाऊन बॅलेट पेपरनं निवडणूक व्हाव्यात, यासाठी फॉर्म भरून घेणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव, फोटो आणि सही असलेले ते फॉर्म जनतेकडून भरून घेतले जातील. विरोधकांचा २१ ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा निघणार असून, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे जनतेनं भरलेले फॉर्म देण्यात येतील. हा पहिला टप्पा राहणार आहे. तसेच निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हाव्यात, यासाठी जनतेला आवाहन करत आहोत, त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.
देशात ईव्हीएम मशीनवर संशय घेणारं वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकी आधी सत्ताधारी पक्षाकडून जागांचे आकडे सांगितले जात आहेत. इतका विश्वास त्यांच्याकडे आला कुठून? त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याला वाव मिळत आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.
हा पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहीजे, 21 तारखेचा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! – अजित पवार
महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचं वेगळं लक्ष असतं. या निवडणुकांना सामोरं जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
मागच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा अशा प्रकारची मागणी केली होती. अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, ही कुण्या एका राजकीय पक्षाची नव्हे! संपूर्ण जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले.
देशात अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजपने जो अंदाज व्यक्त केला तसा निकाल लागला. अनेकांनी याबाबत ईव्हीएम मशीनवर निवडणूक होऊ नये अशी भूमिका व्यक्त केली परंतु हे अमान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *