Breaking News

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय पाठोपाठ आता ईडीही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडीचे सत्र सुरु

मुंबई: प्रतिनिधी

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला.

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली.प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित करत त्यांना सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्यास सांगितले.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप करणारं खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान कोविडवरून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी विरूध्द भाजपा असा सामना रंगला असून भाजपाकडून कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेनेला लक्ष करण्यात येत आहे. त्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निवडणूकी दरम्यान २ मे नंतर राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. परंतु २ मे उलटून गेली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अजून सत्तेवर कायम असून भाजपाला सरकार पाडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आडून राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडण्यासाठी दबाव तरी आणला जात नाही ना? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *