Breaking News

अखेर बारावीच्या परीक्षा रद्द ! मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा करत १२ वीची परिक्षाही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे अनलॉकबाबत वडेट्टीवारांना युटर्न घ्यावा लागला. परंतु त्यांनी केलेली १२ वीची परिक्षा रद्दची घोषणा अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर करत वडेट्टीवार यांची अर्धी घोषणा सत्यात उतरून दाखवून दिली.

कोरोना १९ची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेता परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. इ. १२ वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा अशी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत एकसमान धोरण निश्चित करावे, अशीही केंद्राकडे मागणी केली होती.

या विनंतीनुसार केंद्र सरकारने सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. मागील १४ महिने विद्यार्थी अभ्यासाच्या व परीक्षेच्या तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी  व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसुत्रता असावी यासाठी राज्य शासनानेही राज्य मंडळाच्या इ.१२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

याबाबत शालेय शिक्षण विभागाने परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी, तांत्रिक सल्लागार, शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्ती इत्यादींशी विविध स्तरावर सखोल चर्चा केली होती .   विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द कराव्यात व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा असाच या बैठकांमधील तज्ज्ञांचा कल होता. राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.  या विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पात्र विद्यार्थी यांना  “फ्रन्ट लाईन वर्कर”चा दर्जा द्यावा व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे मार्च २०२१ मध्ये अशी मागणी केली होती. या मागणीचा पुनरुच्चार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आणि सर्व संबंधितांना आदेशित करण्याबाबत केंद्र सरकारला पुन्हा विनंती केली.

कोव्हीड 19 चा काळ आपणा सर्वांसाठी खास करून विद्यार्थ्यांसाठी कठीण आणि आव्हानात्मक होता. अशा काळातही आपण शिक्षण व अभ्यास सुरू ठेवला. शिक्षकांनीही ऑनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू ठेवली याबद्दल सर्वांचेच शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले . शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या जिद्दीला सलाम. काही दिवसांत परिस्थिती सामान्य होईल अशी मला आशा आहे आणि आपण सगळे पुन्हा मोकळा श्वास घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *