Breaking News

…आणि मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा राहिला अर्धवट खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयनेत उतरू शकले नाही

मुंबई : प्रतिनिधी
मागील दोन दिवस कोकणातील चिपळूण, महा़ड येथील आलेला पुर आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सातारातील पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. मात्र सातारा आणि परिसरात हवामान खराब असल्याने त्यांना साताऱ्यात उतरता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुणे येथे परतावे लागल्याने पाहणी दौरा अर्धवट राहीला.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर कोयना येथे उतरू शकले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच इतर यंत्रणांकडून माहिती घेऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले.
कोयनानगर येथे पुरग्रस्तांच्या निवारा केंद्रास ते आज सकाळी भेट देणार होते. तसेच जिल्ह्याची आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. यासाठी सकाळी मुख्यमंत्री पुण्याहून हेलिकॉप्टरने निघाले होते. अद्याप या भागातील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही, हवामानाचा सुद्धा अडसर आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बचाव कार्य करावे , पूरग्रस्तांना तातडीने अन्न , कपडे, औषधी यांची मदत करावी तसेच कोविड प्रादुर्भाव घेता प्रशासनाने वैद्यकीय पथकांना योग्य त्या सूचना द्याव्यात व या आपत्तीमुळे कोविड रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
दरम्यान सांगली आणि कोल्हापूर परिसरातही पुराचे प्रमाण वाढत असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले. सातारा येथील पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोल्हापूर येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार होते. मात्र साताराच्या दौराच अर्धवट राहील्याने आता ते उद्या मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री कार्यालयाने व्यक्त केली.

Check Also

…ओबीसी व खुल्या वर्गावरचा अन्याय दुसरीकडे भरून काढणार राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे. शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *