Breaking News

राज्यातील २५२ तालुक्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल

मुंबईः प्रतिनिधी
यंदाच्या वर्षी मराठवाडा, विदर्भात पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. मार्च महिना यायला अद्याप चार महिन्याचा कालावधी अद्याप शिल्लक राहीलेला असतानाच या दोन्ही विभागातील विहीरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील १३ हजार ९८४ गावांमधील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यातील विहिरीतील पाणी साठा तपासण्याचे काम हाती घेतले. या सर्वेक्षणा दरम्यान ३५३ तालुक्यांमधील गावातील पाणी पातळी तपासणी करण्यात आली. या ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यातील १३ हजार ९८४ गावांमधील पाण्याच्या पातळीत १ मीटर पेक्षा जास्त गत ५ वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येत आले. तर यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये ३ मीटरपेक्षा तर ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटरपेक्षा घट झाली. तर ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटर पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हे सर्वेक्षण सप्टेंबर अखेर पर्यंत करण्यात आले असून त्याचा अहवाल नुकताच पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या १३ हजार ९८४ गावांमध्ये आगामी काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होवून दुष्काळी परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिर्डीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की दुष्काळ मुक्तीचे काम सुरु झाले आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील १९ हजार गावांमधील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असून दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. असे असेल तर जलयुक्त शिवारच्या कामात खर्च करण्यात आलेला निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे एकतर पंतप्रधान खोटे बोलत असावेत अन्यथा जलयुक्त शिवारच्या कामात भ्रष्टाचार झाले असेच म्हणावे लागेल.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *