Breaking News

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, पॅनिक समाजामध्ये पसरलेले दिसते आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल  या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे,असे म्हणता येणार नाही.

१८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही.

बालरोग तज्ञांच्या संघटनेने देखील हे सुस्पष्ट केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात –

  • तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणे कठीण आहे.
  • मोठ्या माणसाप्रमाणेच लहान मुलांनाही कोविड होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटे मध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
  • ९० टक्के मुलांमधील कोविड सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे.
  • काही मुलांना आय सी यू ची गरज लागू शकते पण त्यांचे प्रमाण फार मोठे नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.

लहान मुलांमध्ये या विषाणूच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट  रिसेप्टर विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत. सध्या माध्यमे राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत.

मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोविड मुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिले आहे. हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखावरुन दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही.

( सोबत एक आलेख मी जोडला आहे. या मध्ये पाहिले तर मागील सहा महिन्यात एकूण कोविड रूग्ण संख्येच्या तुलनेत वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या प्रमाणात फारसा बदल झालेला दिसत नाही.म्हणजेच मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण स्थिर आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. )

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुले जरी कोविड बाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. आपण अगदी मे महिन्याचे  उदाहरण घेतले तरी अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.०७ एवढे आहे. साधारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो, असे हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.

लहान मुलांमध्ये कोविडचे प्रमाण वाढू शकते हे भाकीत मनावर घेऊन आपण त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही तयारी वाया जात नाही. परंतु त्यामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे फारसे हितावह नाही. आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा. तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.

लेखक- डॉ. प्रदीप आवटे.

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *