Breaking News

घरगुती कामगार कल्याण मंडळाला १०० कोटी द्या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्यसरकाने तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत करून राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली.

देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सप्ताह’ अभियानांतर्गत आ. अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने घरकाम करणाऱ्या महिलांना कोरोना नंतर उद्भवलेलेल्या परिस्थितीत अधिक नेटकेपणाने आणि जलदगतीने घरकाम करण्याचे एका आठवड्याचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण व पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन आज कांदिवली पूर्व विधानसभेचे आ.अतुल भातखळकर व जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत घरेलू काम करणाऱ्या महिलांना नव्या सुरुवातीसाठी सज्ज करण्याच्या हेतूने कांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने व प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांच्या सहकार्याने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह, कांदिवली पूर्व येथे आठ दिवसांच्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाची आज सुरुवात झाली. यात १४० महिलांनी सहभाग घेतला असून त्यांना कोरोनासह जगताना स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, चेहऱ्यावर कोणते मास्क असावे, त्याचा वापर कसा करावा, सॅनिटायझर नियमित कसे वापरावे, सुरक्षित अंतरावर राहून कामे कशी करावीत, कामे अधिक जलद गतीने कशी करावीत, इलेक्ट्रॉनिक उपकरणे कशी हाताळावी, संभाषण कौशल्य कसे असावे, घरात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करावे, आदी महत्वपूर्ण बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांच्या उपस्थितीत केवळ ४% टक्के व्याजदरावर १० हजार रुपये कर्ज वाटप कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत आज १७५ महिलांनी नोंदणी केली असून, त्यांना लवकरच कर्जाचे वाटप केले जाणार आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *