Breaking News

ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, मी धर्मांतर केले नाही: केंद्रीय मंत्री आठवलेंकडून पाठराखण क्रांती रेडकर मात्र प्रसारमाध्यमांवरच संतापल्या

मुंबई: प्रतिनिधी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणारे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे रोज सातत्याने नवेनवे गौप्यस्फोट करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण मागासर्गीयच असल्याचे सिध्द करण्यासाठी वानखेडे कुटुंबियांनी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना कागदपत्रे दाखविली. त्यावेळी मंत्री आठवले यांनी वानखेडे कुटुंबिय हे आंबेडकरी अनुयायी असल्याचे प्रमाणपत्र देत ते हिंदू-महार या मागासवर्गीय जातीतीलच असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली.

नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक हे वानखेडे कुटुंबियावर आरोप करत आहेत. परंतु मागासवर्गीय समाज वानखेडे कुटुंबियासोबत असून यापुढे त्यांनी कोणतेही आरोप करू नयेत असा इशारा आठचवले यांनी मलिक यांना दिला.

वानखेडे हे मुळचे रिसोड तालुक्यातील असून ते हिंदू-महार या जातीतच जन्माला आल्याचे सांगत आपण कधीही धर्मांतर केले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी रामदास आठवले यांनी ज्ञानदेव वानखेडे यांना त्यांच्याकडील कागदपत्रे दाखविण्यासंदर्भात सूचना केली. त्यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्याकडील आधार कार्ड, राज्य सरकारी सेवेत असताना त्यांचे असलेले ओळखपत्र, त्यांचा जातीचा दाखला, पासपोर्ट, निवडणूक मतदार ओळखपत्र, त्यांच्या निवृत्त झालेले दाखले आदी रिसोड तालुक्यात ४ एकर जमिन खरेदीची कागदपत्रे यासह अन्य काही कागदपत्रे त्यांनी प्रसारमाध्यमासमोर सादर केली. मात्र समीर वानखेडे यांच्या जन्म दाखला आणि जातीचा दाखला ते दाखवू शकले नाहीत.

मलिक हे एक खरेच भंगारवाले असून १०० रूपयांना नटबोल्ट विकणाऱ्या भंगारवाल्याकडे १०० कोटी रूपयांची मालमत्ता कशी आली असा सवाल करत त्यांच्या इतक्या मोठ्या संपत्तीची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी वानखेडे यांनी केली.

यावेळी मलिक यांनी प्रसिध्द केलेला निकाहनामा खोटा आहे का असा सवाल प्रसारमाध्यमानी उपस्थित केला असता ते म्हणाले की, तो निकाह नामा खोटा नाही. मात्र २७ वर्षानंतर तो कोण कुठला काझी काहीही सांगत असल्याचा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

नवाब मलिक यांचा जावई नशेडी आहे, त्यांची मुलगी नशेडी आहे. त्यांचे सारे कुटुंब या व्यवसायात आहे. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुली आणि जावयाकडे लक्ष देवून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांवर जाहीर आरोप करण्याऐवजी त्यांनी थेट न्यायालयात जावे आणि तेथे त्यांनी सिध्द करावे असे आव्हानही त्यांनी नवाब मलिक यांना देत त्यांनी यापुढे आरोप केले तर आपण त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी समीर वानखेडे यांच्या जन्म दाखल्याची आणि निकाह नाम्याची प्रत सादर करण्याची मागणी केली असता समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या प्रसारमाध्यमावरच भडकत म्हणाल्या, मी कोणा कोणाला कागदपत्रे दाखवत बसू मला या सगळ्या गोष्टीचा वैताग आलाय आता डोक्यावरून पाणी चाललंय असे ओरडून म्हणाल्या. या सगळ्या गोष्टी मला विचारण्यापैक्षा तुम्ही मलिक यांना त्यांच्या जावयाबद्दल मुली बद्दल का विचारत नाही? असा सवाल करत त्यांना काय करायचेय कुणाचा नवरा मुस्लिम आहे, कोणाची बायको ख्रिश्चन आहे या गोष्टींचे त्यांना काय करायचे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ही नीट घेता येईना कधी ते बाबा आंबेडकर म्हणत होते तर कधी ते बाबासाहेब म्हणत होते.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *