Breaking News

एसटीतील कर्मचाऱ्याने बदली मागितल्यास राजीनामा म्हणून समजणार

परिवहन मंत्री दिवकार रावते यांचा अजब निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये चालक-वाहक पदावर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी जर मागितली तर त्या कर्मचाऱ्याचा राजीनामा पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच यापुढे वाहक-चालकांच्या सर्व बदलीच्या प्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याची अजब घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

परिवहन मंत्री रावते यांच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून त्यांच्या विक्षिप्त स्वभावाचा फटका कर्मचाऱ्यांनी का सोसायचा असा सवालही कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून चालक आणि वाहक या पदासाठी ४ हजार २४२ जागा कायमस्वरूपी भरण्यात येणार असून या नव्या जागा मराठा आरक्षणासह भरण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहीरात प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

या १५ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगांव, नाशिक आणि पुणे या ११ जिल्ह्यांमधील बँकलॉग भरून काढण्यात येणार आहे. तर उर्वरीत चार जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यामधील युवकांना राज्यभरातील भरतीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, औरंगारबादेत मेगा सिटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बससेवेसाठी एकूण ५६० जागा कंत्राटी पध्दतीवर भरण्यात येणार आहेत. यासाठी दरमहा १५ हजार रूपये मानधन व ५०० रूपये वाढ देण्यात येणार आहे. या पध्दतीने पाच वर्षासाठी ही भरती करण्यात येणार असून त्यानंतर एसटी महामंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या एसटी महामंडळाचा तोटा २८०० कोटी रूपयांचा आहे. तो कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात येत असून शिवशाही बसचे अपघात कमी झाले आहेत. यापुढील शिवशाही बसवर एसटी महामंडळाचाच चालक-वाहक राहणार असून त्यासाठी प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *