Breaking News

सुप्रिया सुळेंच्या सूचनेची धंनजय मुंडे यांच्याकडून अंमलबजावणी दर आठवड्याला दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करणार- धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून दर आठवड्याला याबाबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली .

दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असून मार्चपासून कोरोनामुळे मंदावलेल्या कामांना वेग देण्याबाबत सूचना त्यांनी केल्या. दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांनी सुचवल्याप्रमाणे दिव्यांगांच्या प्रश्नाबाबतचा आढावा दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी दत्ता बाळसराफ, दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर अन्य पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

नवीन शैक्षणिक धोरण व दिव्यांगांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम, महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग धोरण-२०१८ व कृती आराखडा, दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी व त्याचा विनियोग आदी विषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रांच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.

दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळांची नोंदणी सुलभ करणे तसेच विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे जसे की श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव आदी उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी विभाग निहाय वेबिनार आयोजित करून त्याचा आढावा विभागास सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सामाजिक न्याय विभाग व  स्टार की फाउंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक श्रवणयंत्र, दिव्यांगांना कृत्रिम अवयव, ज्येष्ठ नागरिकांना विविध आवश्यक साहित्य आदी उपलब्ध करून देण्याचे निश्चित झालेले आहे. याअंतर्गत  जालना व बीड या दोन जिल्ह्यात सर्वेक्षण करून आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे. तर जालना जिल्ह्यात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरीत जिल्ह्यातील या कामांना गती देण्याबाबतही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Check Also

देवेंद्र फडणवीसांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नरांना भेटून केली ही मागणी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठ्यासाठी सहकारी, जिल्हा बँकांना परवानगी द्या!

मुंबई: प्रतिनिधी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *