Breaking News

नाविन्यपुर्ण शोध आणि तरुणाईचा उत्साह

आपत्ती निवारणासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर

कल्पना करा जर एखाद्या इमारतीला आग लागण्यापुर्वी त्या इमारतीने आपल्याला आग लागण्याची शक्यता आहे असे ट्विट केले तर? खुप उंच डोंगरावर अडकेलेल्या अपघातग्रस्त विमानाला आपण जमीनीवरुनच बघू शकलो तर? भुकंप किंवा एखाद्या दुर्घटनेत बहुमजली इमारतीच्या खाली अडकलेला एखादा जीव वाचविण्यासठी यंत्र मिळाले तर? या सर्व कल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. नुकतीच मुंबई येथे आयआयटी पवई चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद पार पडली. या परिषदेला मला उपस्थित राहता आले.

यात ‘स्टार्ट अप ॲण्ड इन्होव्हशन’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. यात आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करता यावे यासाठी नावीन्यपूर्ण अशा कल्पना आणि तंत्रज्ञान याचा वापर करण्याबाबत देशभरातील युवा उद्योजकांनी स्टार्टअपच्या माध्यमातून केलेले सादरीकरण बघुन अचंबित झाले.

या सादरीकरणात अनेक विषय हाताळण्यात आले. यात अनुभवायला मिळालेल्या विविध शोधांना स्टार्टअपच्या माध्यमातून बळ देण्यात येणार आहे. काही निवडक शोध या प्रमाणे होते. यशराज इन्फ्रास्ट्रक्चरच्या याकंपनीने भूकंपरोधक घराची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले.यापध्दतीने तयार करण्यात आलेले छोटे घरकूल हे आपतकालीन परिस्थिती उद्भवलेल्या ठिकाणी तातडीने उभारता येते. आपादग्रस्त कुटुंबाना कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत येथे थारा देता येऊ शकतो. कोणत्याही मजुरांचा सहकार्याशिवाय केवळ चार माणसांच्या मदतीने हे घरकुल कुठेही उभे करता येऊ शकते. यात एखाद्या अपघात स्थळी तात्पुरता दवाखाना देखील उभारता येऊ शकतो. भुकंपासारख्या आपत्तीनंतर स्थानिकांना हक्काचा निवारा मिळेपर्यंत तात्पुरती वसाहत उभी करता येऊ शकते, शाळा देखील भरवता येऊ शकते. आपत्ती ओसरल्या नंतर त्या घरांचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हे स्ट्रक्चर भाडे तत्वावर पुरविण्याची नाविन्यपुर्ण उद्योग कल्पना पुढे आली. केवळ तीन लाख रुपयाच्या खर्चात उभे राहु शकणा-या या घराला आयुष्य देखील किमान दहा वर्ष एवढे आहे.

एखाद्या इमारतीला आग लागल्यास आणि अग्नीशमन दलाची शिडी पोहचण्यास अडचण येत असेल अशा भागात अपिरन्स एस्केप सिस्टिम बसवल्यास वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांची यासिस्टिमच्या माध्यमातून सुटका करता येते. ही सिस्टिम एक पोकळीवर आधारित अशी जागा तयार करते. आग लागली की खिडकीतून, किंवा मोकळ्या जागेतून बाहेर पडण्यासाठी लगबग सुरु होते. यात वरच्या मजल्यावरुन उडी मारल्याने किंवा सुरक्षितपणे खाली उतरण्याचा मार्ग नसल्यानेही जीवित हानी होते. यासाठीच एक नाविन्यपुर्ण कल्पना पुढे आली आहे. इमारत बांधकामाच्यावेळी ही व्यवस्था इमारतीचा भाग म्हणून जोडून घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थीतीत ती कार्यान्वित करावी किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींना आपत्तीच्यावेळी अग्निशमन दलाचा भाग म्हणून वापरता येईल. ज्या ठिकाणी शीडी पोहचू शकत नाही आणी ज्या ठिकाणी सध्या आग पसरलेली नाही अशा इमारतीच्या भागात हायड्रोलिक जॅकच्या मदतीने ही एस्केप सिस्टीम वर पोहचवून यातून एकेकाला सुखरुप खाली उतरवता येते. यासाठी आत असलेल्या पोकळीचा वापर करून स्वतःला सुरक्षीतपणे खाली आणायचे.  

एखादी बहुमजली इमारत कोसळल्यास ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का हे तपासण्यासाठी कॉम्बॅट रोबोटेक्सने तयार केलेले छोटे चेंडू ढिगाऱ्याखाली सोडल्यास त्यावर लागलेल्या सेन्सरद्वारे अडकलेल्या व्यक्तींची माहिती सहज मिळू शकते. क्रिकेटचा चेंडुसारखा आकार असलेला हा छोटा रोबोट अशावेळी खुप महत्वपुर्ण काम करु शकतो. ढिगारे असलेल्या ठिकाणी असे खुप सारे चेंडू खाली घरंगळत जातात आणि काही सजीव वस्तु त्याच्या सेन्सरने वेधली की कॅमेराने त्याचे छायाचित्र घेण्यात येते आणि त्याच वेळी संगणकावर माहिती दिली जाते. छोटासा पण कामाचा असा हा रोबो चेंडू म्हणूनच या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवून गेला.

या शिवाय या स्पर्धेत अनेक नाविन्यपुर्ण कल्पना पुढे आल्या. यात गटार साफ करण्यासाठी विषारी वायू सहन करत आत शिरण्यापेक्षा जानयूटेक याकंपनीने तयार केलेल्या रोबोटच्या माध्यमातून हे काम करता येणार आहे. जेनेरिक मेम्ब्रेन याकंपनीने तयार केलेल्या मशीनमधून अपघातस्थळी रुग्णाला ऑक्सीजन देता येतो. हे उपकरण मोटारबाईकच्या साहायाने कुठेही चालू शकते. एखाद्या इमारतीला आग लागण्यापुर्वीच आगिची शक्यता निर्माण झाल्यास लगेच माहिती देणारे फायर ट्विट हे साफ्टवेअर, किंवा अपघाताची माहिती एकत्रित करुन त्यावर कार्यवाही सुचविणारे ड्रोन आणि त्याला संलग्न सोफ्ट्वेअर हे सगळेच एका पेक्षा एक सरस असे शोध या ठिकाणी बघायला मिळाले.  

आयआयटी पवईयांच्या ‘साईन’या उपक्रमाअंतर्गत देशभरातील तरूण उद्योजकांकडून आपत्ती निवारणासाठी स्टार्ट अप आणि नाविन्यपूर्ण  योजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. आयआयटी येथील मॅकनिकल इंजिनीअरींगचे प्राध्यापक मिंलिद अत्रे आणि मॅनेजमेंटचे प्राध्यापक आनंद कसरे यांनी या सर्वसादरीकरणाचे परिक्षण केले. यापैकी सर्वोत्तम स्टार्ट अपलाअनुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार असे तीन पारितोषिक परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रदान करण्यात आले.

तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले तर त्यांच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करुन घेता येतो हे या निमित्ताने  पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लेखक-अर्चना शंभरकर (माहीती व जनसंपर्क विभागातील अधिकारी)

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *