Breaking News

मुकबधिरांची तेजोमयी यशोदीप रामेश्वरीच्या हसऱ्या चेहऱ्याने मुकबधिरांच्या जीवनाला फुटला कंठ

माणसाचा जन्म आहे हा! म्हणजे संकटे आलीच. विविधरुपांनी ती आपल्यासमोर येतात. मग घाबरायचं कशाला? संकटावर मात करुन आपलं आयुष्य जगायचं. जे होणार असतं, घडणार असतं ते ते होत राहणारच, घडणारच. पण, त्यामुळं डगमगून न जाता पुढं चालतच रहायचं. आल्या प्रसंगाला हसत सामोरं जाणं, झालेलं नुकसानही हसण्यावारी न्यायचं. आपला हसरा चेहरा पाहिला की समोरच्याचं दुःखही थोडं हलक होतं. हसणं हाच सगळ्या निराशा, दुःख, संकटावरचा मुलमंत्र असं मानून यशाची पायरी चढत, आपल्या प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्यानं मुकबधीरांच्या आयुष्यात तेजोमयी दीप प्रज्वलित करणारी व्यक्ती म्हणजे रामेश्वरी जाधव.
समजा! तुमच्या घरात, संस्थेत एखादी चोरी झाली तर तुम्ही काय कराल? पोलिसांकडे धाव घ्याल. त्रागा करुन घ्याल. चोरांच्या नावाने शिमगा कराल. आतून तुटून पडाल. पण, रामेश्वरी जाधव यांचा मुलमंत्र काही वेगळाच सांगतो. माझ्या संस्थेत चोरी झाली. मुलांसाठी जमविलेल्या वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, कपडे सारं काही चोरांनी लुबाडून नेलं. पोलिसात तक्रार दिली. जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. रडून, निराश होऊन गेलेल्या वस्तू काही परत येणार नव्हत्या. पोलिसात तक्रार दिली असली तरी त्यातून फार काही हाती लागणार नव्हतं. एरव्ही चोरी झाल्यानंतर आपण इतरांना सांगतो. मन मोकळं करतो. सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मी काहीचं केलं नाही. नशिबात जे होतं ते राहिलं. जे नव्हतं ते गेलं. पोलिस ठाण्यात काही पत्रकार नेहमीप्रमाणे आले होते. त्यांना बातमी हवी होती आणि मी केलेल्या तक्रारीची नोंद पोलीस ठाण्यात होती. त्याआधारे त्यांनी बातमी केली. दुसऱ्या दिवशी संस्थेत झालेल्या चोरीची बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली. अचानक फोनवर फोन येऊ लागले. अगं, संस्थेत चोरी कधी झाली? कशी झाली? आज अमुक अमुक पेपरमध्ये बातमी वाचली. आम्हाला सांगितलं नाही. काही मदत हवी का? अनेकांचे फोन कॉल्स येत राहिले. त्या फोन कॉल्सलाही हसत हसत उत्तर देत राहिले. मदत तर हवीच होती. कारण, प्रश्न मुकबधीर मुला-मुलींच्या संगोपनाचा होता. आश्चर्य म्हणजे त्या चोरीमुळे संस्थेला फायदा झाला. जितकं चोरीला गेलं होतं, त्यापेक्षा दुपटीनं अधिक सामान, किराणा, वस्तु, भांडी मदत रुपानं पोहोचली. ज्यांना संस्थेचं, माझं काम माहित होतं त्या त्या सर्वांनी जमेल तशी मदत केली होती. संस्था चालविणं हे कठिण काम असलं तरी आल्या प्रसंगाला हसत सामोरं गेलं की कशाचीही कमतरता भासत नाही याचा प्रत्यय देणारी ती घटना होती असं रामेश्वरी जाधव सांगतात.
बारामती हे नाव आता कुणाला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत हे नाव सर्वतोमुखी आहे. याच बारामतीत कऱ्हावागज येथे रामेश्वरी जाधव यांची यशोदीप कला, क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत निवासी मुकबधीर शाळा आहे. २०१० साली ही शाळा बांधण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच रामेश्वरी जाधव यांनी एनएसएस जॉईन केलं. त्यातूनच सामाजिक चळवळ, समाजसेवा विषयाकडे आकर्षित होत गेल्या. शिक्षणाचा उपयोग समाजसवेसाठी करायचा हे स्वप्न बाळगून त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर मात्र त्यांना आपलं स्वप्न पुर्ण होणार ही खात्री वाटू लागली. कारण, सासरच्या वडिलधारी व्यक्तींचे सहकार्य आणि प्रेरणा! त्यांनी रामेश्वरी यांचे स्वप्न पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. बारामतीमध्ये इतर अपंगासाठी सोईसुविधा होत्या. परंतु, मुकबधीर मुला-मुलींना शाळेची सोय नव्हती. अनेक मुकबधीर मुले जिल्हा परिषेच्या नॉर्मल शाळेत शिकण्यासाठी जात होती. परंतु, या मुलांना त्यांच्यासाठी असलेल्या विशेष शाळेतच शिक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे याच मुकबधीरांसाठी काम करण्याचा निर्णय रामेश्वरी यांनी घेतला. ध्येय मोठे होते. प्रवास अवघड होता. पण, जिद्दही कायम होती. स्वतःवरचा विश्वास, कुटूंबांचे सहकार्य आणि समाजात माणुसकी जपणारे समाज बंधू भगिनी यांच्याकडून मिळणारे प्रेम, ममता, प्रेरणा यांच्या पाठबळावर उभी राहिली यशोदील कला, क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत निवासी मुकबधीर शाळा.
हा प्रवासही काही सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या. अनेक प्रसंग घडू लागले. त्यावर वेळेला स्वतःचे दागिने मोडीत काढत, घरोघरी जाऊन मुलांसाठी कपडे, खेळणी, जे जे मिळेल ते गोळा करत राहिल्या. त्या कष्टाचे, जिद्दीचे फळ मिळत गेले. समाज जोडला जाऊ लागला. या विशेष मुलांच्या पालकांकडून कोणतीही फी किंवा कसलाही खर्च घेणार नाही या ठाम विचार करुनच पाऊल टाकले. त्या विचारांशी ठाम राहूनच समाजाकडून मिळणाऱ्या मदतीमुळे शाळेने नऊ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आज या शाळेत ३५ मुकबधीत मुले-मुली अगदी मोफत शिक्षण घेत आहेत. सुरवातीला भाड्याच्या जागेत चालणारी ही शाळा आता संस्थेच्या स्वतःच्या जागेत दिमाखाने उभी राहिली आहे. मुलांना चांगले, शिक्षण, कपडे, शैक्षणिक सुविधा, साहित्य, जेवण, राहण्याची उत्तम सोय मोफत केली जाते. वय वर्ष ३ पासून ते १८ वर्षांपर्यंतची मुले-मुली येथे शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षणासोबतच संस्कृती, संस्कार व मुलांच्या अंगभुत कला, कौशल्य विकसीत होण्यासाठी नाट्य, नृत्य, पथनाट्य, मुकनाट्य, विविध सामाजिक व वैचारिक प्रबोधनाचे अभिनयात्मक प्रशिक्षण मुलांना दिले जाते. त्यासाठी विशेष शिक्षकामचीही नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक स्पर्धात्मक कार्यक्रमात या विशेष मुलांना पुरस्कारही मिळाले आहेत.
आम्हीही समाजातील एक भाग आहोत. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा आम्हालाही अधिकार आहे. हा संदेश देत निवासी मुकबधीर शाळेतील मुकबधीर मुले पर्यावरण पुरक वस्तू बनवितात. डेकोरेटिव्ह पेपर बॅग, मातीचे फ्लॉवर पॉट, डिझाईनर मातीच्या पणत्या, पानाफुलांचे ग्रिटिंग्ज अशा बऱ्याच वस्तु ही मुले आपल्या कौशल्याने बनवतात. रामेश्वरी जाधव यांना फक्त शाळा उभारुन थांबायचे नाही. तर, त्याहीपुढे जायचे आहे. १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांसाठी पुर्नवसन केंद्र सुरु करणे, प्रौढ मुकबधीर मुलामुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, शिवणकाम, फाईल मेकींग, हस्तकला, बुकबाईडिंग, स्क्रिन प्रिटींग, लॉण्ड्री, केशकर्तन, ब्युटीपार्लर, संगणक यासारख्या व्यवसायांचे प्रशिक्षण देणे. कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, उच्चार उपचार, समुपदेशन आणि संपूर्ण कर्णबधिरांसाठी कॉक्लिअर इम्प्लांटबाबत मार्गदर्शन व सल्ला देणे, मुकबधीर मुले, व्यक्तींसाठी मोफत क्लिनीक सुरु करणे यासारखे नवनवीन उपक्रम राबवायचे आहेत. हा सर्व प्रवास मोठा आहे. न थांबणारा आहे. अनेक उद्दिष्ठे गाठायची आहेत. दुर्लक्षित मुलांना समाजात एकरुप करायचे आहे. नॉर्मल मुलांबरोबर समाजाबरोबर त्यांना वावरता आलं पाहिजे. आणि स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी ही संस्था अखंडपणे धडपडत आहे. या मुकबधीर मुलांना कुणाच्याही सहानुभुतीवर जगायला लागू नये म्हणून शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कलात्मक वस्तू बनविण्याचे संस्थेद्वारे प्रशिक्षण देणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टींवर रामेश्वरी जाधव यांना अधिक काम करायचे आहे. यासाठी समाजबांधवांनी तन, मन, धनाने पाठिशी उभे रहावे अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

शब्दांकन- महेश पवार

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *