Breaking News

धनजीशा बोमनजी कूपर ते उद्धव ठाकरे : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वैभवशाली परंपरा ! ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी घेतलेला ६१ वर्षातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा आढावा

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !’ १ मे १९६० या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमरशेख आदी लढवय्या नेत्यांच्या आंदोलनानंतर केंद्रातले नेहरु सरकार नरमले आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला. अर्थात, विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने अभूतपूर्व यश मिळवित काँग्रेसची धुळधाण उडवली. मध्य प्रदेशातला मराठी भाषिक भाग असलेला विदर्भ आणि त्यात विधानसभेच्या असलेल्या ६२ जागा या काँग्रेसला खुणावू लागल्या होत्या. कारण त्या ६२ जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि त्या जर महाराष्ट्रात आल्या तर काँग्रेसचं वर्चस्व कायम राहील. आणि मग मध्य प्रदेशाची राजधानी असलेली नागपूर महाराष्ट्राची उपाजधानी झाली. नागपूर करार झाला. विदर्भ महाराष्ट्रात आला.

विदर्भ आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन मराठवाडाही आपल्यात आला. पण त्यापूर्वी म्हणजे १९३७ साली बॉम्बे प्रोविन्स अर्थात मुंबई इलाखा अस्तित्वात होता. सर धनजीशा बोमनजी कुपर हे १९३७ साली मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना पंतप्रधान म्हणून संबोधण्यात येत होते. १९ जुलै १९३७ रोजी बाळ गंगाधर खेर हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री झाले. १९ जुलै १९३७ ते ४ नोव्हेंबर १९३९ आणि ३ एप्रिल १९४६ ते १६ एप्रिल १९५२ या कालावधीत बाळ गंगाधर खेर यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द केली. १७ एप्रिल १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६ या कालावधीत कर्मठ प्रशासक असलेल्या मोरारजी रणछोडजी देसाई यांनी बॉम्बे प्रोविन्सचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटले असतांना केंद्राने आणखीन डिवचण्यासाठी मुंबई द्विभाषिक राज्याचा घाट घातला आणि त्याचे १ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सेनानी काही केल्या हटत नाहीत हे पाहिल्यावर दिल्लीने गुडघे टकले आणि १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हेच संयुक्त महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. यशवंतराव हे सुसंस्कृत आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात. चीनने भारताशी युद्ध छेडले तेंव्हा १९६२ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना सन्मानाने बोलावले. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’, असं वर्णन तेंव्हा करण्यात आलं होतं.

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द १ मे १९६० ते २० नोव्हेंबर १९६२ अशी होती. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी यशवंतरावांचे उत्तराधिकारी म्हणून मारोतराव सांबशिव कन्नमवार हे वैदर्भीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मारोतरावांची कारकीर्द अल्पकालीन ठरली. मारोतरावांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे राज्यशकट हाकण्यासाठी ठोस व्यवस्था करणे गरजेचे होते आणि मुख्यमंत्री पदाचं आसन रिकामं राहणं हे सुद्धा योग्य नव्हतं म्हणून २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ या कालावधीत परशुराम कृष्णाजी उर्फ बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री झाले. ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सूत्रे वसंतराव फुलसिंग नाईक यांनी स्वीकारली. विदर्भातले बंजारा समाजाचे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून पुढे आले. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द मोठी होती, ती आणखीही मोठी झाली असती पण पश्‍चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत आलेलं महाराष्ट्राचं नेतृत्व मराठवाड्यालाही मिळावं म्हणून उचल खाल्ली आणि वसंतरावांच्या नेतृत्वाला २० फेब्रुवारी १९७५ रोजी पूर्णविराम मिळाला. मराठवाड्याचे नेते आणि करड्या शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे शंकरराव भाऊराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची २१ फेब्रुवारी १९७५ रोजी शपथ घेतली पण त्यांचं हे मुख्यमंत्रीपद १६ एप्रिल १९७७ पर्यंतच टिकले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संपूर्ण क्रांतीचे आंदोलन झाले आणि पंतप्रधान इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ रोजी आणिबाणी लागू केली होती. सर्व विरोधकांना तुरुंगात डांबलं होतं. त्यातून इंदिराजींना समजावण्यासाठी सरसावलेले तरुण तुर्क मनोहर धारिया, चंद्रशेखर आणि कृष्णकांत, स्वपक्षीय नेते ही सुटले नाहीत. देशाच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमटणार हे ओघानेच आले.

शंकररावांच्या जागी सांगलीचे सहकार महर्षी वसंतराव बंडुजी पाटील अर्थात वसंतदादा यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा आली. १७ एप्रिल १९७७ ला मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादांना ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ अशी मुख्यमंत्रीपदाची दुसर्‍यांदा धुरा मिळाली पण त्यांच्या पाठीत त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या तरुण अशा मंत्र्याने, शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी खंजीर खुपसला (असा वाक्पप्रचार तेंव्हा रुढ झाला होता)  आणि जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष यांच्या बरोबर मोट बांधून पुरोगामी लोकशाही दल स्थापन करुन वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला. १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर काँग्रेसी मंत्रिमंडळ अधिकारारुढ झाले. पण केंद्रात झालेल्या उलथापालथीमुळे पवारांची राजवट १७ फेब्रुवारी १९८० पर्यंतच टिकली. केंद्रातही आलेले बिगर काँग्रेसी सरकार कांहीच्या कपाळ करंटेपणामुळे गमवावे लागले. दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पार्टीची बोट फुटली. ज्या इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमध्ये राजनारायण यांनी पराभव केला होता आणि इंदिराजींना सत्तेपासून दूर केले होते. त्याच इंदिराजी नंतर फिनिक्स सारख्या उसळून वर आल्या. महाराष्ट्रात तोवर काँग्रेसचे तुकडे पडले होते. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, बॅरिस्टर रामराव आदिक, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, नासिकराव तिरपुडे ही मंडळी इंदिराजीं समवेत निष्ठेने राहिली तर यशवंतराव (चड्डी कॉंग्रेस-चव्हाण-रेड्डी), शंकरराव (मसकाँ) शरद पवार (समांतर कॉंग्रेस) अशी शकले  काँग्रेसची झाली होती.

काँग्रेस (इंदिरा)चे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले या धाडसी नेत्याच्या गळ्यात इंदिराजींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. १२ जानेवारी १९८२ पर्यंत तुफानी राजवट गाजवणार्‍या बॅरिस्टर अंतुले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. एका बॅरिस्टरला पर्याय म्हणून इंदिराजींनी दुसरे बॅरिस्टर शोधले. ते होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. परंतु त्यांनी इंदिराजींना विनम्रपणे नकार देऊन दिल्लीतच राहणे पसंत केले. त्यामुळे अंतुलेंचे उत्तराधिकारी म्हणून २० जानेवारी १९८२ रोजी बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विनोदबुद्धीच्या बॅरिस्टर भोसल्यांची कारकीर्द १ फेब्रुवारी १९८३ पर्यंतच चालली. कॉंग्रेसमध्ये सत्तास्पर्धा एव्हाना उफाळून आली होती. काँग्रेसला सत्ता टिकवणं महत्वाचं होतं. म्हणून पुन्हा वसंतदादा पाटील यांच्याकडे हायकमांडने नेतृत्व सोपवलं. २ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५ आणि १० मार्च १९८५ ते १ जून १९८५ या कालावधीत दादा मुख्यमंत्री पदावर होते. ३ जून १९८५ रोजी डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पण वैद्यकीय परीक्षेत मुलीचे गुण वाढवण्याच्या आरोपामुळे डॉ. निलंगेकरांना ७ मार्च १९८६ रोजी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. डॉ. निलंगेकरांचे उत्तराधिकारी मराठवाड्याचेच शंकरराव चव्हाण १४ मार्च १९८६ ला पुन्हा मुख्यमंत्री झाले. ते २४ जून १९८८ पर्यंत या पदावर राहिले. याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडविणारे शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपले राजकीय ‘मानसपिता’ यशवंतरावांच्या चुका सुधारून पुढे झेप घेणे पसंत केले आणि राजीव गांधी यांना औरंगाबादेत बोलावून जाहिर मेळाव्यात आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. परिणामी शरदरावांच्या शिरावर २५ जून १९८८ रोजी मुख्यमंत्री पदाचा मुकुट चढविण्यात आला. काँग्रेस पक्षातर्फे शरदरावांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद ३ मार्च १९९० पर्यंत तसेच ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च१९९३ ते १३ मार्च १९९५ असे तीन वेळा उपभोगता आलं. १९९१ साली शरदराव केंद्रात पामलू वेंकट (पी.व्ही.) नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री झाले. तेंव्हा २५ जून १९९१ रोजी सुधाकरराव राजूसिंग नाईक यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. सुधाकरराव हे तर शरदरावांचे डमी आहेत असा आभास निर्माण करण्यात आला. पण २३ फेब्रुवारी १९९३ पर्यंत सुधाकररावांनी जी कारकीर्द गाजवली, त्यामुळे हा खरा शिकारी आहे, हे सिद्ध झालं. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शरदरावांनी १९९२ ची दंगल हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून सुधाकररावांकडून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे द्यायला लावणं हायकमांडला भाग पाडलं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर ध्रुवीकरण सुरू झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या वाटाघाटीनंतर हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती अस्तित्वात आली. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत या युतीला घवघवीत यश मिळालं. पण सत्ता मिळू शकली नाही.

१९९५ च्या निवडणुकीत युतीने जोरदार मुसंडी मारली आणि पवार विरोधी आमदार गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून ‘मातोश्री’ बंगल्यावर डेरेदाखल झाले. पडद्यामागून विलासराव देशमुख आणि सुधाकररावांनी सोंगट्या फिरवल्या. १४ मार्च १९९५ रोजी शिवसेना नेते डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी शिवसेना-भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून दादरच्या शिवतीर्थावर शपथ घेतली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. चार वर्षानंतर जोशींचे जावई गिरीश व्यास प्रकरण तापले आणि मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी डॉ. मनोहर जोशी यांना राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. तो दिवस होता ३० जानेवारी १९९९ ! डॉ. जोशींनी क्षणाचाही विलंब न लावता त्यागपत्र देत ‘वर्षा’ सोडले आणि खाजगी मोटारीने आपला दादरचा ‘ओशियाना’ गाठला. १ फेब्रुवारी १९९९ रोजी नारायण तातू राणे हे मुख्यमंत्री झाले. ऑक्टोबर १९९९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा राजकीय जुगार राणे खेळले. याच वेळी सोनिया गांधींचे विदेशी मूळ असे कारण देऊन शरद पवारांनी काँग्रेस बरोबर फारकत घेऊन आपला ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ नावाने वेगळा संसार थाटला. त्यामुळे एका बाजुला शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत झाली. पण फाजील आत्मविश्‍वास आणि आसुरी महत्वाकांक्षा यामुळे युतीला साडेचार वर्षाच्या सत्तेवर पाणी सोडावं लागलं. काँग्रेसच्या विरोधात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी सत्ता येऊ शकत होती. परंतु ऐनवेळी शरद पवारांनी विलासराव देशमुख यांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची राजवट सुरु झाली.

१८ ऑक्टोबर १९९९ रोजी विलासराव दगडोजीराव देशमुख मुख्यमंत्री झाले. कोणताही वाद अंगावर ओढवून न घेता हसत खेळत, राष्ट्रवादीशी जुळवून घेत विलासरावांनी १८ जानेवारी २००३ पर्यंत हा राज्यशकट चालविला. मॅडम सोनिया गांधींनी १८ जानेवारी २००३ रोजीच विलासराव आणि सुशिलकुमार या ‘दो हंसो का जोडा’ मधला दुसरा हंस अर्थात सुशिलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं. २००४ च्या विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढून आघाडी पुन्हा सत्तेवर आली. परंतु १ नोव्हेंबर २००४ रोजी पुन्हा विलासराव मुख्यमंत्री झाले. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे विलासरावांच्या शिरावरचा मुख्यमंत्रीपदाचा ‘ताज’ हिरावला गेला आणि त्यांच्याच राजकीय गुरूंचे चिरंजीव (गुरूबंधू) अशोक शंकरराव चव्हाण ८ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्री झाले. २००९ च्या निवडणुकीत आघाडी पुन्हा सत्तेवर आली आणि मॅडम सोनियांनी पुन्हा अशोकरावांच्या पारड्यात वजन टाकलं. ७ नोव्हेंबर २००९ ला मिळालेलं मुख्यमंत्रीपद ‘आदर्श’ घोटाळ्यात नाव आल्यामुळं अशोकरावांना ११ नोव्हेंबर २०१० ला सोडावं लागलं.

आणि त्याच दिवशी १० जनपथवरून सोनियाजींनी महाराष्ट्राकडे ‘मिस्टर क्लिन’ असं ‘पृथ्वी मिसाईल’ धाडलं. चार वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण यांच्या कारकीर्दीत बर्‍याच अघटित घटना घडल्या. २६ सप्टेंबर २०१४ रोजी दुसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. नरेंद्र मोदी नावाच्या लाटेने मे २०१४ मध्ये आधीच काँग्रेसची धुळधाण उडवली होती आणि ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सुद्धा काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चारही पक्ष आघाडी आणि युती तुटल्यामुळे स्वतंत्र लढले. भारतीय जनता पक्ष विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीस उतरलेले ४४ वर्ष वयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र गंगाधर फडणवीस हे बिगर काँग्रेसी सरकारचे चौदावे मुख्यमंत्री झाले. वानखेडे स्टेडियमवरच्या ऐतिहासिक आणि शाही सोहळ्यात ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना तसेच मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे लढविण्यात आल्या. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणुकांचे निकाल लागले. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आले तर शिवसेनेच्या वाट्याला ५६ जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आणि काँग्रेसच्या ४४ जागा निवडून आल्यामुळे एकहाती सत्ता कुणीही स्थापन करु शकत नव्हते. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना अडून बसली होती. कारण भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान १८ फेब्रुवारी २०१९ रोजी मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर जी बंद दाराआड चर्चा झाली त्यात सत्ता आणि पदांचे समसमान वाटप ठरले होते. परंतु निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यास तयार नव्हता. प्रत्येक पक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरबारात हजेरी लावून येत होता. पण बहुमत कुणाजवळ ही नसल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. राजकीय घडामोडी वेगाने घडत होत्या. भारतीय जनता पक्षाच्या समवेत निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. या दरम्यान भारतीय जनता पक्षाने अजित पवार या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या बरोबर संधान सांधले आणि २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी साडेसात वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. पण अस्थिर वातावरणात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला नाही. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे मथळे २३ नोव्हेंबर २०१९ च्या सर्वच वर्तमानपत्रात झळकले. परंतु फडणवीस-अजितदादा यांच्या युतीने ही वर्तमानपत्रे रद्दीत गेली.

अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्याच्या ऐंशी तासात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नांवाची नोंद झाली. सरकार बहुमत सिद्ध करु शकत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या प्रमुखांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची अभूतपूर्व आणि ऐतिहासिक वातावरणात शपथ घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात धनजीशा बोमनजी कूपर ते यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्री पदाची वैभवशाली परंपरा समोर येतांना काँग्रेसचे सरकार ते काँग्रेस पक्षाच्या सहभागाचे सरकार हे एक राजकीय वर्तुळ पहायला मिळाले. या सर्वच घडामोडी पाहता सत्ता स्थापन करण्यासाठी कोणीही कुणाबरोबरही जाऊ शकतो. कोणीही कोणत्याही पक्षात ये जा करु शकतो. निष्ठा, वैचारिक बैठक, तत्त्व, सिद्धांत, नीतिमत्ता, नैतिकता यांचा टेंभा कुणीही मिरवू नये, नाकाने कांदे कुणीही सोलू नयेत, हेच वास्तव आहे. राजकारणात सुद्धा ‘सोय जाणे तो सोयरा’ हेच खरे. सर्वांना/ सर्वच राजकीय पक्षांना जनतेचा विकास करायचा आहे, शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला परंतु अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्यकर्ते कटिबद्ध होतील आणि बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह कर्नाटकातील ८६५ गावे महाराष्ट्रात येतील तेंव्हा खऱ्या अर्थाने अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ ही बुलंद घोषणा देण्यात परमानंद प्राप्त होईल.

 -योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321. 

yogeshtrivedi55@gmail.com              

 

 आजपर्यंतचे मुख्यमंत्री !

 मुंबई इलाखा :  धनजीशा बोमनजी कूपर,  बाळ गंगाधर खेर

मोरारजी रणछोडजी देसाई                                   मुंबई द्विभाषिक राज्य :

यशवंतराव बळवंतराव चव्हाण                        मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र :        यशवंतराव बळवंतराव चव्हाण

मारोतराव सांबशिव कन्नमवार

परशुराम कृष्णाजी सावंत  (हंगामी)

वसंतराव फुलसिंग नाईक

शंकरराव भाऊराव चव्हाण

वसंतराव बंडुजी पाटील

शरदचंद्र गोविंदराव पवार

अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले

बाबासाहेब अनंतराव भोसले

शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर

सुधाकरराव राजूसिंग नाईक

मनोहर गजानन जोशी

नारायण तातू राणे

विलासराव दगडोजीराव देशमुख

सुशिलकुमार संभाजीराव शिंदे

अशोक शंकरराव चव्हाण

पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

Check Also

नरिमन पाँईटमधील एका टॉवरमध्ये ठरतात महाविकास आघाडीची धोरणे पुणे-मुंबईतले दोन उद्योजक, काही आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत होते बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कामकाज चालवित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *