Breaking News

नावात “जय” आणि “नाथ” असलेल्यांची भाजपाला अॅलर्जी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत लगावला टोला

परभणी : प्रतिनिधी

ज्यांच्या नावात जय, नाथ आहेत अशी माणसे आजकाल भाजपाला चालत नाहीत. त्यामुळे धनंजय, जयसिंग सारखी माणसे तसेच गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत असा टोला भाजपाला लगावत त्यामुळेच आता त्यांना प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

“५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजपा विरोधी पक्षात ही लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साऱ्यांना लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि भाजपा नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला. त्यामुळे पराभूत मानसिकतेने भाजपा पदवीधरची निवडणूक लढवत असल्याचा चिमटाही त्यांनी लगावला.

भाजपाला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. गायकवाड यांनी भाजपाने अनेक वर्ष आपल्यावर अन्याय केल्याचं त्यांनी सांगितलं. “भाजपा आता पूर्वीसारखी उरली नाही. नव्याने आलेल्या नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये. मी लवकरच माझ्या मूळ घरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे”, असे त्यांनी जाहीर केले.

“मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढण्याआधीच भाजपा पराभूत मानसिकतेत असून ३५ उमेदवार रिंगणात असताना आपल्यातील बंडाळी शमवण्यापेक्षा भाजपा नेतृत्वाने सतीश चव्हाण या नावाचे उमेदवार उभे करून आपली शक्ती क्षीण झाल्याचे सिद्ध केले आहे. अशा कृतीला सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून उत्तर द्यावे”, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *