Breaking News

देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम

मुंबईः प्रतिनिधी
निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कंपनींवर माझा विश्वास नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा गौप्यस्फोट केला. त्यास प्रतित्तुर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची परिषद पाहिली आणि काळजी वाटली. जी काही त्यांनी अचाट कामे केली त्याचा आढावा त्यांनीच आढावा घेतला तर बरे अशी खोटक टीका सुरुवातीलाच करत गेल्या ५ वर्षात युतीत आढवे आलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिकवणीनुसार शब्द विचार करून देतो. त्यानुसार शब्द देत शब्दाला जागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोटारडे ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा संदर्भ देवून देवेंद्र फडणवीस हे आमच्यावर खोटेपणाचा आरोप करत आहेत. निवडणूकीच्या कालावधीत मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. तर तेच माझ्याकडे आले. लोकसभा निवडणूकांसाठी युती झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात मुख्यमंत्री पद आम्हाला पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडली. त्यावेळी देवेंद्र आणि अमित शाह यांनी सुरुवातीला निवडणूकीनंतर बघु असे उत्तर दिले. त्यावरून चर्चा फिसकटली. त्यानंतर ते पुन्हा माझ्याशी चर्चा करायला आले. त्यावेळी कोणाच्या कितीही जागा येवोत मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी भूमिका आम्ही मांडत शिवसेनाप्रमुखांना दिल्याची आठवण करून दिली. त्यावर भाजपाकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. पण आम्ही त्याला साफ नकाल दिला. त्यावर अमित शाह यांनी ठिक है जैसा है वैसा रहे असे बोलले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका अशी गळ घालत माझी अडचण होईल अशी विनवणी केली. त्यामुळे मी जाहीर केले नाही असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीपासून आतापर्यंत नोटाबंदीपासून अनेक विषयांवर जे खोटे बोलले ते सर्वांना माहिती असून खोटे कोण बोलतोय हे ही सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब यांना जे वचन दिलेय ते वचन मी पूर्ण करणारच असा निर्धार व्यक्त करत मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक ठिकाणी सभेला गेलो. त्या सभेत त्यांनी माझा छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला. पण हरियाणातील ज्या दुष्यंतबरोबर त्यांनी युती केली त्या दुष्यंतने भाजपावर कोणत्यास्तरावर जावून टीका केली होती ते एकदा पहा असे सांगत दुष्यंत यांच्या भाषणाची ओडिओ रेकॉर्डींग त्यांनी ऐकवली.
आम्हाला गोडबोलून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या गोड मिठीत आम्ही फसणारे नसल्याचे सांगत मी नको त्या माणसांच्या सोबत गेल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
२०१४ साली आम्हाला न विचारता हेवी वेट इंडस्ट्रीजचे खाते गळ्यात बांधले. त्यानंतर काहीतरी करतो म्हणाले पण काही केले नाही. त्यानंतर २०१९ ला तुम्हाला कोणतं खाते हवे अशी विचारणा केली आणि पुन्हा तेच खात गळ्यात बांधल. त्यामुळे खोटं कोण बोलतोय हे स्पष्ट होत असल्याचे सांगत मला खोट बोलणारं ठरविणाऱ्यांबरोबर मी बोलणार नाही असे सांगत युतीबाबतची चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२२० ते २३० जागा जिंकून येणार असल्याचे सांगत भाजपने आम्हाला १२४ जागा दिल्या. त्या आम्ही स्विकारल्या, सातारची लोकसभेची आमची जागा आम्हाला न विचारता उदयनराजे भोसले यांना दिली. यावरून तुम्ही प्रत्येकवेळी खोट बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील जनतेला उल्लू बनविण्याचे काम त्यांनी थांबवावे. गंगा साफ करता करता यांची मने घाण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बहुमत नसताना तुमचे सरकार कसे येणार? असा सवाल करत माझा पर्याय मी बघायला मोकळा आहे. तोडफोडीचे राजकारण करत मेघालय, गोवा, मिझोरम येथे सरकार आणलंत. आता तुम्ही म्हणताय तोडाफोडीची गरज नाही.आम्ही जे करतो ते खुलेपणाने करतो. त्यामुळे आमच्यावर पाळत ठेवून काहीही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *