Breaking News

सरकार स्थापनेवरून रंगली फडणवीस आणि शिंदे यांच्यात खडाजंगी अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेत्यांची घसरली गाडी

नागपूरः विशेष प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत हे सरकार जनमताचा कौल नाकरून सत्तेत विराजमान झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गोवा, मेघालय येथे काय केले ते आठवून पहा असा उपरोधिक टोला लगावला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील खडाजंगी पहिल्यांदाज उघडउघड विधानसभेच्या सभागृहात पाह्यला मिळाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी ही खडाजंगी पाह्यला मिळाली.
अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सामना वर्तमान पत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात प्रसिध्द झालेले संदर्भ वाचून दाखवित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे फडणवीस यांच्या या संदर्भावर आक्षेप घेत पवार यांच्याविषयी वाचून दाखविण्यात येत असलेले सर्व संदर्भ कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विधानसभाध्यक्षांकडे केली.
तरीही फडणवीस हे सातत्याने शरद पवार यांच्याविरोधातील जून्या वृत्ताचा संदर्भ देत आपले भाषण तसेच पुढे सुरु ठेवत हे सरकार जनमताचा कौल नाकारून आलेले सरकार असल्याचे म्हटले.
त्यावर अखेर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे मध्येच उभे रहात फडणवीस यांना म्हणाले की, पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता. तुमच्यासोबत आम्ही निवडणूका लढविल्या. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागील अधिवेशनाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले असून ही वेळ का आली त्याबाबत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राज्याचे नेते आहेत. त्यांचा आदर आपण करतोच आहोत. तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जुने संदर्भ सांगून आरोप करू नये अशी विनंती केली. तसेच भाजपाने मेघालय, गोवा, हरयाणा येथे काय केले ते सर्वांनी पाह्यले असून त्याबाबत आपण बोलू नये असा इशारा फडणवीस यांना दिला.
यास फडणवीस यांनी प्रतित्तुर देताना म्हणाले की, या सर्व राज्यात निवडणूकीत सोबत असलेला पक्ष निवडणूकीनंतर सत्तेसाठी दुसरीकडे गेला नव्हता. उध्दव ठाकरे यांनी निकालाच्या दिवशीच सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले होते. तुम्ही (शिवसेना) आमच्या विरोधात लढले असतात तर तुमच्या कृत्याचे समर्थन झाले असते. मात्र आपल्या चुकीच्या कृत्याला तत्वज्ञानाची विनाकारण जोड देवू नये असे स्पष्ट केले.
अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यात हस्तक्षेप करत शरद पवार यांच्याविरोधात जूने संदर्भ देवून कोणतीही टिपण्णी करू नये अशी सूचना फडणवीस यांना करत आपण राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावे असे सांगितले. त्यामुळे अखेर या खडाजंगीला पूर्ण विराम मिळाला.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या आजच्या टीका टीपण्णीमुळे राज्यातील सत्ता हातची निघून गेल्याची आणि शिवसेनेने साथ सोडल्याने आलेला राजकिय राग आणि खदखद उफाळून आल्याची चर्चा विधान भवन परिसरात रंगली.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *