Breaking News

फडणवीस अभिभाषणावर बोलताय की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला

नागपूरः प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत होते तेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले की श्रद्वेय बाळासाहेबांप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला ? असा उपरोधिक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना टोला लगावला.
फडणवीस यांना आमचे सरकार ऑटो रिक्षा दिसते, पण आमचे सरकार हे विमान आहे. फडणवीस यांच्या भाषणातून सत्तेत नाही याची उद्विग्नता किती असावी याचे दर्शन आज घडले. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कपट केला म्हणून हे सरकार आलं. यांनी कधी उभ्या आयुष्यात दिलेला शब्द पाळला नाही आणि आमच्या सरकारला म्हणतात की शब्द पाळा म्हणून अशी टीकाही त्यांनी केली.
४४, ५४, ५६ अशा आकडेवारीच्या जोरावर ही सरकार स्थापन होऊ शकते ही आपली लोकशाही सांगते. लोकशाही काय असते हे एकदा भाजपला कळायला हवेच होते. ही देशातली खरी लोकशाही, भाजप लोकशाहीला दाबायला निघाले होते.
साम-दाम-दंड-भेद हे आम्हाला माहिती होतं पण साम दाम दंड भेद यासह ईडी, सीबीआय सर्वच गोष्टींचा वापर केला. केंद्राच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थाचा वापर सत्तेत येण्यासाठी भाजपने केल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकरी, बेरोजगार, माय माऊल्या ज्या असुरक्षित नाही त्यांचा स्वार्थ आम्हाला साधायचा आहे, म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केले. मी निवडणूक काळात फडणवीस यांना मित्रत्वाचा सल्ला दिला होता, काही करा पण पवार साहेबांच्या नादाला लागू नका, नाही ऐकले. पवार हा एक विचार आहे. मग्रूर भाजपला जागा दाखविल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षातील लोक स्थगिती सरकार म्हणून टीका करत आहे. मात्र मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की स्थगिती करत असताना सर्वच योजनांची चौकशी देखील करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन झाले. मात्र अद्यापही मागच्या सरकारला स्मारक उभारता आले नाही. शिवस्मारक करण्याचे सोडा स्मारकाच्या निविदेत भ्रष्टाचार केला. छत्रपतीच्या कामात यांनी पाप केले म्हणून नियतीने यांना विरोधी पक्षात बसवले. माझी मागणी आहे की या निविदा प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
मागील सरकार ऐतिहासिक कर्जमाफी केली. मोठा गाजावाजा केला की सरसकट कर्जमाफी दिली. पण मागील सरकारला सरसकट शब्दच कळला नाही. ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले, दीड दीड तास लोकांना उन्हात उभे केले याचे पाप लागले आणि यांना घरी बसावे लागले. शेतकऱ्यांचा तळतळाट लागला म्हणून आलेलं सारं गेल्याची टीकाही त्यांनी केली.
उद्योग महाराष्ट्र कायम एक नंबरला राहिला आहे. मागच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्र गतीहीन झाला पण आता नाही हे सरकार खऱ्याचं आहे आणि महाराष्ट्राच्या पाठी हे सरकार खंबीर राहील हेच राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
७२ हजारांची मेगाभरती या सरकारने सुरू केली. नोकऱ्या सुरू केल्या नाहीत, पण पक्षात भरती केली. आमचे शिवेंद्रराजे आमच्याकडे असताना दुसऱ्या रांगेत असते मात्र शिवेंद्रराजे आता मागे बसतात. ज्याला यांनी पक्षात घेतले त्यांना सडवले
आज भाजपाला वाटतं की काही तरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ. उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद रखो लेकीन १५ साल रखो. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. हे सरकार शब्दाचे पक्के आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा येत नसता हे लक्षात ठेवा असा राजकिय टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
मागील सरकारच्या काळात १६ हजार शेतकरी दगावले. मात्र फडणवीस सरकारने मदत केली नाही. सरकारचं काय होईल हे बघितले नाही. मात्र पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत होते. आमच्या सरकारच्या काळात सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगत फडणवीस म्हणतात आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. हे साफ खोटे आहे मराठा आरक्षण दिले ते पंढरपूरच्या विठ्ठलाने. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करता आली नाही. तेव्हा मराठा आरक्षण मिळाले. ६४ प्रणांची आहुती दिली तेव्हा आरक्षण मिळाले तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.
जीएसटीमुळे अनेक राज्यांचे नुकसान झाले. जीएसटीचा परतावाच केंद्र सरकारने दिला नाही. जीएसटीचे १५ हजार कोटी रुपये महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे आहे. नवं सरकार कधी पडतंय यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहे. मात्र आदरणीय पवार साहेब, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे, हे सरकार १५ वर्षे चालणार त्यामुळे विरोधकांनी विरोधी पक्षातच बसण्याची मनस्थिती ठेवावी असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *