Breaking News

फडणवीसांचा सल्ला, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिगिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. बोंडअळीने कापूस नष्ट झाला. बोंडसडीत वरून बोंड चांगले दिसत असले तरी ते फोडताच कापूस सडलेला असतो. यंदा बोंडसडीचा प्रकार सर्वत्र आढळून येतो आहे. साधारणत: एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल आणि फार कमी ठिकाणी २ क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांष शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे शेतमालाची खरेदी अजून प्रारंभ झालेली नाही. ओलसर कापसाला खाजगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे. सोयाबीन सुद्धा ओला असल्याने ३००० रूपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. त्यामुळे खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी भरडला जातो आहे. सुमारे ८ लाख हेक्टरहून अधिक नुकसान असताना प्रत्यक्षात शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.
गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये सुद्धा ५० टक्केच शेतमालाची आवक होत असल्याची स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, हे स्पष्टच आहे. राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल. अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *