Breaking News

फडणवीसांची पत्रकार परिषद, जोश नसलेली आणि पडलेल्या चेहऱ्याची होती अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा जोश नव्हता. तेथे उपस्थित असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चेहरा पडलेला आणि डिमोरलाईज झालेले दिसत होता अशी उपरोधिक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपा नेते फडणवीसांचे आरोप म्हणजे बिनबुडाचे अशी टीकाही त्यांनी केली.

राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सांसदीय कार्यमंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीत राज्यातील सुशिक्षित लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते देत विजयी केले. जर राज्यात आघाडी सरकारच्या विरोधात जनमत असते तर आतापर्यतच्या सर्वाधिक मताधिक्याने आघाडीचे उमेदवार विजयी झाले नसते. हा पराभव त्यांच्या जास्तच जिव्हारी लागल्याने ते नाराज असल्याचे स्पष्ट येत होते असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याबाबत फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून अजित पवारांनी प्रतिप्रश्न करत दरेकर यांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे कोणी बोलले का? असे विचारत आमच्या सत्ताधारी मंत्र्यांपैकी कोणी बोलले का? असा सवाल करत फडणवीसांना बहुतेक दरेकरांना पक्षातून बाहेर काढायचे असेल अशी खिल्लीही फडणवीसांच्या आरोपाची उडविली.

राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. शासकिय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबर त्यांच्या पेन्शनसाठी आपण निधी कमी पडू देत नसून विकास कामासाठीही आता निधी उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर नुकताच मुद्रांक शुल्काबाबत घेतलेल्या सरकारच्या निर्णयामुळे बाजारात तेजी येत असल्याचे सांगत केंद्राकडून अद्यापही जीएसटीचे पैसे येत नसल्याने तिजोरीवर थोडासा ताण रहात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड अद्याप जाहीर केली नसल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यपालांनी यादी नाकारल्याचे तुम्हाला सांगितले का? असा सवाल पत्रकारांना विचारत त्यांच्याशी अद्याप बोलणे झाले नाही. त्यांच्याशी बोलणे झाले की तुम्हाला दोन मिनिटात नावे कळतील असे स्पष्ट केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठरविण्यात आलेल्या ड्रेस कोडबाबत विचारले असता ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेत एवढाच उद्देश असल्याचे स्पष्ट करत जीन पॅन्ट्सबाबत विचार करू.

Check Also

कोविडला नैसर्गिक आपत्ती जाहिर करा, कर्ज हप्ते वसुली करू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *