Breaking News

गुजरातला पाणी देण्यावरून विधानसभेत गोंधळ पाणी अडविण्यासाठी केंद्राकडे १० हजार कोटी मागितल्याची मंत्र्यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या हिश्शाचे पाणी रोखण्याऐवजी ते गुजरातला देण्यात येत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकच गोंधळ घालत पाणी चोर, पाणी चोर भाजप पाणी चोरच्या घोषणा देत विधानसभेचे सभागृह दणाणून सोडत सरकारला चांगलेच धारेवर धरले. या गोंधळातच जलसंधारण मंत्री गिरिष महाजन यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पासाठी १० हजार कोटी रूपये मागितल्याची माहिती देत सभागृहाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान भाजपचे अतुल भातखळकर यांनी मुंबई व उत्तर महाराष्ट्राला पाणी पुरवठा करू शकणाऱ्या दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावर उत्तर देताना सद्यपरिस्थितीत दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून पाणी उपसा करण्यात येत नसल्याने महाराष्ट्राच्या हिश्शाचे पाणी गुजरातला देण्यात येत असल्याचे सांगितले.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी हरकत घेत राज्य सरकारकडून बऱ्याच घोषणा केल्या होत्या. तरीही पाणी गुजरातला देण्यात येत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्यावर राज्यमंत्री शिवतारे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने सर्व विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर अध्यक्षांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक आपल्या म्हणण्यावर ठाम राहीले.

याप्रश्नी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी प्राथमिक करार केला. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने कोणतीच कारवाई केली नाही, कि पाणी अडविण्या संदर्भात कृती केली नाही. त्यामुळे हे सरकार गुजरातला पाणी देण्यासंदर्भात जाणीवपूर्वक कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप केला.

याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही सरकारच्या हेतूबाबत शंका उपस्थित करून राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी मुंबईला आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावे अशी मागणी केली.

त्यास उत्तर देताना मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या काळात या प्रकल्पाची फाईल धुळखात पडली होती. मात्र या सरकारने ही फाईल पुढे नेली. या प्रकल्पातून सध्या पाणी उपसणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे हे पाणी गुजरातला जात आहे. मात्र या प्रकल्पातील पाणी राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे १० हजार कोटी रूपये मागितले आहेत. केंद्राकडूनही हा निधी मिळेल असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणीवपूर्वक देण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. तरीही विरोधकांकडून पाणी प्रश्नावर गोंधळ तसाच सुरुच ठेवला आणि या गोंधळाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढील कामकाज पुकारले.

Check Also

शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी “स्टार्स” प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *