Breaking News

आम्ही बेरोजगार होतो, पण आता आम्ही देणारे आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून यशस्वी झालेल्या तरुणांकडून कोरोना संकटग्रस्तांना मदत

मुंबई : प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी होऊन राज्यातील असे अनेक तरुण आता कोरोना संकटग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्यात येते. महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या कर्जात एकही थकबाकीदार नाही. सर्व लाभार्थी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करत आहेत. कर्ज घेऊन स्वयंरोजगार सुरु केलेले राज्याच्या विविध भागातील हे लाभार्थी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. या लाभार्थ्यांनी तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत राज्यातील विविध भागातील लाभार्थ्यांनी त्यांच्या स्वत:च्या योगदानातून संकटग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली.
१५०० जणांना अन्नधान्य किट वाटप
महामंडळाच्या कर्ज योजनेतून व्यवसाय सुरु करुन यश मिळवलेले औरंगाबाद जिल्ह्यातील गंगामाई लॉजिंग व मेडिकलचे मालक प्रशांत जगताप यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान दिले आहे. मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने प्रशांत जगताप यांनी व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गोरगरीब लोकांना अन्नदान केले. मुकुंदवाडी भागात अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. आजपर्यंत त्यांनी सुमारे १ हजार ५०० लोकांना मदत केली आहे. तसेच दिवस-रात्र बंदोबस्त करीत असलेले पोलीस कर्मचारी यांना चहा, नाष्टा व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले.
खालापुरीमध्ये किराणा वाटप
महामंडळाचे आणखी एक लाभार्थी ध्यास अभ्यासिकेचे संचालक लक्ष्मण नवले यांनी त्यांच्या मूळ गावी खालापूरी येथे गावातील गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यामध्ये १० किलो गव्हाचे पीठ, ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, १ किलो हरबरा डाळ, मसाला, गोडतेल, मीठ, कांदे, बटाट्यासह एकूण १२ जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
जिल्हा समन्वयकाकडून घरी जेवण बनवून वाटप
महामंडळाचे सातारा जिल्हा समन्वयक राहुल रमेश यादव हे संकटात अडकलेल्या गरजू वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, मनोरुग्ण, सफाई कर्मचारी व पोलीस कर्मचारी अशा ४० ते ५० जणांना दररोज घरी जेवण बनवून पार्सल करून गरजूपर्यंत पोहोचवत आहेत. आतापर्यंत साधारण बाराशे लोकांपर्यंत त्यांनी मदत पोहोचवली आहे.
सुपने विभागात पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
महामंडळाचे सातारा जिल्हा समन्वयक तुषार उर्फ गणेश पाटील यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सुपने विभागात सुमारे २ टन टोमॅटोचे मोफत वाटप केले. तसेच हातावर पोट असलेल्या सुमारे १२६ कुटुंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, बँक कर्मचारी, विद्युत विभागाचे कर्मचारी यांना मास्कचे वाटप केले.
महामंडळाच्या कर्ज योजनेतून व्यवसायात यशस्वी झालेले असे अनेक लाभार्थी मदतीसाठी पुढे येत आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन मिळालेले यश स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता त्यातून गरजवंतांना मदत करण्याची लाभार्थ्यांची भावना प्रशंसनीय असल्याची प्रतिक्रिया महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व उपाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *