Breaking News

महिलाही कोरोना विरोधी लढ्यात पुढे माविमची ११ लाख रूपयांची मदत तर बचतगटांकडून लाखावर मास्क

मुंबई-यवतमाळ : प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी १ रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविमचे आणि बचत गटाच्या महिलांचे कौतुक केले आहे.
कोविडविरोधी लढ्यामध्ये माविमच्या महिला बचत गटांच्या महिला भरीव योगदान देत आहेत. बचत गटांमार्फत १० लाखाहून अधिक मास्कची निर्मिती आणि ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत सुमारे ६० हजार लाभार्थ्यांना शिवभोजन, मजूर, ऊसतोड कामगार, माथाडी कामगार आदींसाठी जेवणाची सोय, माफक दरात साडेबारा हजार टनाहून अधिक भाजीपाल्याची माफक दरात विक्री, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी उपक्रमांद्वारे समाजाला दिलासा देण्याचे काम केले आहे.
मंत्री ॲड. ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागातील सर्व घटकांनी कोविडविरोधी लढ्यात शासनासोबत काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी माविमच्या बचत गटांतील महिलांनी मुख्यमंत्री सहायता निधीत प्रत्येकी १ रुपये योगदान देण्याची संकल्पना मांडली होती. माविमचे राज्यात सुमारे सव्वालाख बचत गट असून त्यात सुमारे १६ लाख महिला सदस्य आहेत. त्यापैकी बहुतांश महिलांनी प्रत्येकी १ रुपयाचे योगदान दिले असून माविमचे राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन असे मिळून एकूण ११ लाख ३५ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केल्याचे माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी सांगितले.
शासकीय यंत्रणेसोबतच दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आदींचे या लढाईत सहकार्य मिळत आहे. यात बचत गटाच्या महिलासुध्दा मागे नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटात या संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. याच अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाद्वारे मास्क तयार करण्यात आले. १० तालुक्यातील ९३ गावातील १८८ बचतगटाचे यासाठी सहकार्य मिळाले. या बचत गटाच्या ५३० महिलांनी एकूण १ लक्ष ८ हजार ४०९ मास्क शिवण्याचे काम या महिलांनी केले.
यात महिलांनी सुरवातीला ५ लक्ष ७५ हजार ४०० रु गुंतवणूक केली. यातून त्यांनी मास्क तयार करण्याकरीता स्थानिक बाजारपेठेतून सुती कापड खरेदी केले. सदर मास्क तयार झाल्यावर त्यांनी नगर पालिका, बँक, विविध रुग्णालये, ग्राम पंचायत, मेडिकल स्टोर, सामाजिक संस्था आदी ठिकाणी पुरवठा केला. यातून बचत गटाच्या महिलांना निव्वळ नफा ८ लक्ष ५३ हजार २५३ रु. झाला. याशिवाय ६४ महिलांनी १७४३ मास्क मोफत शिवून दिले. तसेच गावातील अतिशय गरीब व गरजू, दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तुंच्या २४६९ किट्स वाटप केले. शिवभोजन योजनेअंतर्गत ११२६२ गरीब लोकांसाठी महिला बचत गटाने भोजनाची व्यवस्था केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *