Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आरोग्य-शिक्षणाला प्राधान्य देत मिशन बिगीन अगेन तीन टप्यातील अनलॉकमधील जीवनाला सुरुवात

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६५ हजाराच्या घरात पोहोचली आहे. मात्र यापैकी २८ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. तर ३४ हजार अॅक्टीव्ह केसेस असून यातील २४ हजार रूग्णांना लक्षणेच नाहीत. तर ८ ते ९ हजार ५०० रूग्णांपैकी १२०० रूग्ण गंभीर आहेत. तर २०० रूग्ण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत कोरोनामुळे राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून आता नव्याने आपण सर्व गोष्टींची अर्थात मिशन बिगीन अगेनची सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळा आता सुरू होतोय. या कालाधीत सर्दी, खोकला, ताप आदींची साधी जरी लक्षणे दिसली तरी तातडीने रूग्णालयात जा, चाचणी करून घ्या, अंगावर आजार काढू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टी भागात दोन दिवसात चक्रीवादळाचे संकट येणार आहे. तसेच काही ठिकाणी ढगफुटी, पूर येण्याची शक्यता आहे. मात्र आपली यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राने सूचनावली दिलीय. कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार. घरातून बाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य आहे. हात सतत धुवणे गरजेचे असून सतत चेहऱ्याला हात लावू नका असे आवाहन करत या लॉकडाऊनमधून आपण टप्याटप्याने बाहेर पडू असा दिलासा देत जगातल्या सर्व देशांची परिस्थिती पाहीली. तेथे काही सुरु झालेल्या गोष्टी पुन्हा बंद करण्यात आल्या. मात्र एकदा सुरु केलेली गोष्टी पुन्हा बंद करणार नाही असे सांगत त्याची सुरुवात आपण ३ जून या तारखेपासून करणार आहोत. या दिवसापासून आपण हातपाय हलवायला सुरुवात करतोय, मॉर्निंग वॉक, सार्वजनिक ठिकाणी फिरायला मोकळीक देत आहोत. मात्र गर्दीला परवानगी दिलेली नसल्याने गर्दी करू नका असे आवाहनही त्यांनी केले.
५ जूनपासून शहर रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने पर्यायी पध्दतीने आपण सुरु करत आहोत. मात्र ट्रायल बेसवर सुरु करत आहोत. मात्र गर्दी करायची नसल्याचे सांगत गर्दी केलात. तर सर्व पुन्हा बंद होईल असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.
८ जूनपासून सर्व कार्यालये सुरु करत असून त्याची सुरुवात १० टक्क्याने करणार आहोत. सध्या आपण कोरोनाच्या सर्वाच्च बिंदूवर आहोत किंवा त्याच्या जवळपास आहोत. मात्र ही संख्या आपल्याला कमी करायची असे सांगत आतापर्यत जी बंधने वापरली तशीच बंधने आपण पाळली तर ही संख्या खाली येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच करण्यास परवानगी देत असल्याचे सांगत कोरोना चाचणीची आवाक्याबाहेर असलेली किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आणायचा प्रयत्न आहे. तसेच त्याच्या लॅब ग्रामीण भागातही उघडण्यासाठी घराच्या शेजारी सुरू होतील त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत तब्बल १६ लाख कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले आहे. रेल्वेच्या माध्यमातून ११ लाख तर एसटीच्या माध्यमातून ५ लाख ५० हजाराहून अधिक कामगारांना सीमेपर्यत सोडण्यात आल्याचे सांगून त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगत रेल्वेने केलेल्या सहकार्याबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे त्यांनी आभारही मानले.
शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत विविध पर्यायांचा विचार सुरु आहे. विद्यापीठस्तरावरील परिक्षा घ्यायच्या की नाही याबाबत पर्यायांचा विचार करत आहोत. तरीही परिक्षा न घेतल्यास सदर विद्यार्थ्याला अॅग्रीगेट पध्दतीने मार्क देवून त्याला पास करायचे असा पर्यायाचा विचार केला. तरी एखाद्या विद्यार्थ्याला परिक्षा देवून मार्क वाढवायचे असतील त्यासाठीही पुढे परिक्षा घ्यायची असेही धोरण सध्या तरी ठरविण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले.
शाळापेक्षा शिक्षण कस सुरु करायचं? असा प्रश्न असून ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देवू शकत नाही. त्यामुळे रेडिओ, मोबाईल, टीव्ही, एसडी कार्ड या माध्यमातून शिक्षण सुरु करायचे की कसे यावर सध्या विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात आरोग्य सुविधा वाढवावी लागणार आहे. येत्या काळात प्राधान्य, शिक्षणाला, लोकांच्या अपेक्षेनुसार फिल्ड हॉस्पीटल सुरु करणार, जबाबदारी सरकारने घेतलीय, खबरदारी आता तुम्ही घ्या. या दोन्ही गोष्टी आता एकत्ररित्या जाण्याची वेळ आलीय. एकक पाऊल जपून पुढे टाकू असे आश्वासक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *